नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये भारतीयअर्थव्यवस्था गतीने सुधारली असून, मागणी व व्यावसायिक घडामोडी वाढल्यामुळे कोविड-१९ महामारीच्या धक्क्यातून सावरण्यास अर्थव्यवस्थेला मदत झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, निर्यातीसह आठपैकी पाच संकेतकांनी सप्टेंबरमध्ये चांगली सुधारणा दर्शविली आहे. उरलेले तीन संकेतक स्थिर असल्याचे दिसून आले आहेत.अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, लॉकडाऊन उठविण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर मागणीत वाढ झाली आहे. त्याचा लाभ अर्थव्यवस्थेला झाला आहे. मागणी वाढल्यामुळे रिकामे झालेले साठे भरून काढण्यासाठी वस्तूंचे उत्पादन वाढविण्यात येईल. त्याचा परिणाम म्हणून आगामी काही महिन्यांत व्यावसायिक घडामोडी वेगवान होतील.जाणकारांच्या मते, अर्थव्यवस्थेतील ही सुधारणा पुरेशी मात्र नाही. आशियातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे गाडे चालू वित्त वर्षात रुळावर येण्यासारखी स्थिती अजून तरी दिसत नाही. सप्टेंबरच्या तिमाहीत सकळ राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) १० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की, आर्थिक घडामोडींचा कणा असलेल्या सेवाक्षेत्रात चांगली सुधारणा दिसून आली आहे. या क्षेत्राचा मुख्य निर्देशांक ४९.८ अंकांवर गेला. ऑगस्टमध्ये तो ४१.८ अंकांवर होता. एप्रिलमध्ये तो अवघा ५.४ अंकांवर होता.
जानेवारीनंतर पीएमआयचा उच्चांकपर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स म्हणजेच पीएमआय वाढून ५६.८ अंकांवर गेला आहे. जानेवारी २०१२ नंतरचा हा उच्चांक आहे. सप्टेंबरमध्ये निर्यातीत ६ टक्के वाढ झाली आहे. प्रवासी वाहनांची विक्री २६.५ टक्क्यांनी वाढली आहे. किरकोळ क्षेत्रातील विक्रीत मोठी सुधारणा झाल्याचे शॉपर ट्रॅकने म्हटले आहे. कर्ज मागणी ५.२ टक्क्यांनी वाढली. आदल्या वर्षाच्या तुलनेत ती थोडीशी कमी आहे. आदल्या वर्षी ती ५.५ टक्के होती.