नवी दिल्ली : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील कर्मचारी वर्गासाठी दिलासा देणारी बातमी आहे. यंदा कर्मचाऱ्यांना सरासरी 9.7 टक्क्यांची पगारवाढी मिळण्याची शक्यता असून सर्वात चांगले प्रदर्शन करणाऱ्याला 15.6 टक्के पगारवाढ मिळेल. एचआर कन्सल्टंन्सी कंपनी इयॉनने केलेल्या वार्षिक सर्व्हेमध्ये हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यंदा उत्पादनांना देशांतर्गत मागणी वाढण्याची अपेक्षा कंपन्यांना आहे. तसेच महागाई दर कमी झाल्याने अर्थव्यवस्थाही मजबूत असणार आहे. याचा फायदा नोकरदार वर्गाला होणार आहे. गेल्या वर्षी 9.5 टक्के वेतनवाढ अपेक्षित धरण्यात आली होती. आशियाई प्रशांत क्षेत्रामध्ये दरवर्षीप्रमाणे भारत वेतनवाढीच्या दरामध्ये पहिल्या क्रमांकावर राहणार आहे रशियामध्ये 7.2 टक्के वेतनवाढ होण्याची आशा आहे. तर दक्षिण ऑफ्रिकेमध्ये कर्मचाऱ्यांना 6.7 टक्के वेतनवाढ मिळू शकेल. ब्राझीलमध्ये 5.8 टक्के, अमेरिकेमध्ये 3.1 टक्के, ऑस्ट्रेलियामध्ये 3 टक्के आणि ब्रिटनमध्ये 2.9 टक्के वेतनवाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या अहवालानुसार कंझ्यूमर इंटरनेट कंपन्या, व्यावसायिक सेवा, लाईफ सायन्स, कंझ्यूमर प्रॉडक्ट आणि ऑटो क्षेत्रामध्ये दुहेरी अंकांची वाढ नोंदविण्यात आली आहे. याशिवाय चांगले प्रदर्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1.9 पटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरासरी 15.6 टक्के वेतनवाढ मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचबरोबर नोकरी सोडण्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. 2014-15 मध्ये हा दर 18.1 टक्के होता, तो 2018-19 मध्ये 15.8 टक्क्यांवर आला आहे.