क्रेडिट रेटिंग एजन्सी फिचने शुक्रवारी अदानी प्रकरणावर मौन सोडले आहे. फिचने म्हटले आहे की, अदानी समूहाच्या कंपन्यांच्या रेटिंगवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. एजन्सीने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले असल्याचेही त्यांनी निवेदनाद्वारे म्हटले. शॉर्ट सेलरच्या रिपोर्टनंतर अदानींच्या कंपन्या आणि त्यांच्या सिक्युरिटीजच्या रेटिंगवर त्वरित परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेय. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहाने गेल्या काही दशकांमध्ये शेअर बाजारातील फेरफार आणि अकाउंटिंगशी संबंधित फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
सध्या फिचने अदानी समूहाच्या आठ कंपन्यांचे रेटिंग केले आहे. फिचने अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला BBB-/ स्टेबल रेटिंग दिले आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडला BBB- रेट केले आहे. त्याच वेळी, फिचने अदानी इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडला दिलेले रेटिंग सध्या BBB-/ स्टेबल रेटिंग दिलेय. दुसरीकडे, अदानी ट्रान्समिशन रिस्ट्रिक्टेड ग्रुप 1 ला ATL RG1, BBB-/स्टेबल रेट केले आहे. अदानी ग्रीन रिस्ट्रिक्टेड ग्रुप 2 ला फिचकडून BBB-/ स्टेबल रेटिंग मिळाले आहे. AGEL RG1 आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड वर फिचचे रेटिंग BB+/ स्टेबल आहे.
रेटिंग एजन्सीचा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे. अदानी समूहाने त्यांचे फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान अदानी समूहाचा तो एफपीओ पूर्ण सबस्क्राईबही झाला होता. 24 जानेवारी रोजी हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. दरम्यान, अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळून लावले होते.
अदानींबाबत काय गौप्यस्फोट?हिंडेनबर्गने अदानींच्या कंपनीबाबत केलेल्या रिसर्चमध्ये 3 मोठे आरोप केले आहेत, त्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. हिंडेनबर्गने अदानी समूहावर पहिला आरोप केला आहे की, अदानी समूहाच्या कंपन्यांचे प्राइस अर्निंग रेश्यो अन्य कंपन्यांपेक्षा खूप जास्त आहे. त्यांनी आपल्या अहवालात दावा केला आहे की अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत त्याच क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या इतर कंपन्यांच्या तुलनेत 85 टक्क्यांपर्यंत अधिक आहे.
दुसरा आरोप असा की शेअर बाजारात त्यांनी गैरव्यवहार करून आपल्या शेअर्सची किंमत वाढवली आहे. अदानी समूहावर तिसरा असा आरोप आहे की कंपनीवर 2.20 लाख कोचींपेक्षा अधिक कर्ज आहे. कंपन्यांनी आपल्या क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतल्याचा दावाही हिंडेनबर्गच्या अहवालात करण्यात आलाय.
अदानी समूहाने काय म्हटलेय?हिंडेनबर्गच्या आरोपांवर अदानी समूहाकडून 413 पानांचे उत्तर देण्यात आलं आहे. 'मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन' हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आहे आणि आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हा अहवाल खोटा आहे. हिंडनबर्गचे दस्तऐवज निवडक चुकीच्या माहितीचे एका वाईट हेतूनं केलेलं संयोजन आहे. यात एका विशिष्ट उद्देशाने समूहाला बदनाम करण्यासाठी निराधार आरोप करण्यात आले आहेत, असंही अदानी समूहानं म्हटलंय.