Join us  

अदानींसाठी खूशखबर! ज्या प्रकल्पातून बांगलादेशला विकली जाणार होती वीज, त्यातूनच आता भारतालाही होणार पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 8:25 AM

Adani Power News :केंद्र सरकारनं वीज निर्यातीच्या नियमात बदल केला आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Adani Power News : अदानी पॉवरनं बांगलादेशला (Bangladesh) वीज पुरवठा (Electricity Supply) करण्यासाठी कोळशावर आधारित नवीन वीज प्रकल्प सुरू केला आहे. हा प्लांट झारखंडमधील गोड्डा येथे आहे. या प्रकल्पाची क्षमता १६०० मेगावॅट इतकीअसून यापूर्वी हा प्रकल्प केवळ बांगलादेशला वीज निर्यात करू शकत होता. परंतु, आता केंद्र सरकारनं वीज निर्यातीच्या नियमात बदल केला आहे. यामुळे गौतम अदानी यांच्या अदानी पॉवरला आता भारतातही या प्रकल्पातून वीज विकता येणार आहे. 

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, १२ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या अंतर्गत मेमोद्वारे हा बदल करण्यात आला आहे. या निवेदनात २०१८ च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे जी विशेषत: शेजारच्या देशाला वीज पुरवठा करणाऱ्या वीज उत्पादकांना लागू आहे.

२०१८ च्या नियमांत सुधारणा

केंद्र सरकारनं वीजपुरवठ्याच्या नियमांमध्ये बदल केला. त्याअंतर्गत आता वीजनिर्मिती कंपन्यांना देशातही वीजपुरवठ्याची परवानगी मिळाली आहे. यासंदर्भात ऊर्जा मंत्रालयानं एक निवेदन जारी केलं आहे, ज्यामध्ये शेजारच्या देशाला वीज पुरवठा करण्यासाठीच्या २०१८ च्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या दुरुस्तीनंतर आता अदानी पवार यांना देशातही वीज निर्यातीची परवानगी मिळाली आहे.

वीजेची वाढती मागणी पूर्ण होणार

अशा वीजनिर्मिती केंद्रांना भारतीय ग्रीडशी जोडण्यास मोदी सरकार मंजुरी देऊ शकते, असंही ऊर्जा मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान, या निर्णयामुळे देशभरातील विजेची वाढती मागणी पूर्ण होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया अदानी समूहाच्या प्रवक्त्यानं दिली.

टॅग्स :अदानीवीजगौतम अदानी