Government Employee Salary : केंद्र सरकारनं गेल्या ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) तीन टक्क्यांनी वाढ करून दिवाळीची मोठी भेट दिली होती. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. असं म्हटलं जातंय की, केंद्र सरकार नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याची घोषणा करू शकते. सरकारनं आठव्या वेतन आयोगातील (8th pay commission) फिटमेंट फॅक्टर २.८६ ला मान्यता दिल्यास कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात १८६ टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलाय. सध्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांतर्गत (7th pay commission) दरमहा १८ हजार रुपये मूळ वेतन मिळते, ते वाढवून ५१ हजार ४८० रुपये केलं जाऊ शकतं.
पेन्शनर्सनाही होणार फायदा
नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीचे (NC-JCM) सचिव शिव गोपाल मिश्रा यांच्या मते, सरकार २.८६ चा फिटमेंट फॅक्टर ठरवू शकते. हा आकडा सातव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टर २.५७ पेक्षा थोडा जास्त असेल. हे निश्चित झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होईल आणि त्यांच्या पेन्शनमध्येही १८६ टक्के वाढ होऊ शकते. सध्या पेन्शन ९,००० रुपये प्रति महिना आहे, जी २५,७४० रुपयांपर्यंत वाढू शकते.
अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता
सातवा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू झाला असून साधारणपणे दर तो १० वर्षांनी अपडेट केला जातो आणि तो २०२६ मध्ये पूर्ण होईल. आठवा वेतन आयोग लागू करण्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार पुढील अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये यासंदर्भात घोषणा होऊ शकते. नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीच्या बैठकीत सरकार डिसेंबर २०२४ पर्यंत यासंदर्भात निर्णय घेऊ शकते.
फेब्रुवारी २०१४ मध्ये सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला असून १ जानेवारी २०१६ पासून कर्मचाऱ्यांचं वेतन लागू करण्यात आलं. या आयोगानं कर्मचाऱ्यांचं किमान वेतन सात हजार रुपयांवरून १८ हजार रुपयांपर्यंत वाढवलं होतं आणि इतरही अनेक लाभ दिले होते.