नवी दिल्ली - नवे आर्थिक वर्ष नोकरदारांसाठी गोड बातमी घेऊन आले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळालेली उभारी, विविध क्षेत्रांमध्ये वाढत असलेली गुंतवणूक, जागतिक वित्त संस्थांचा भारताच्या आर्थिक वृद्धिवर वाढता विश्वास या स्थितीत मोठ्या कंपन्यांची कामगिरी मोलाची ठरणार आहे. नाविन्यपूर्ण प्रयोग आणि अभिनव कल्पनांवर भर देणाऱ्या वरिष्ठ पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना २० टक्के पगारवाढ दिली जाऊ शकते, असे मायकेल पेज इंडिया सॅलरी गाइड २०२४ च्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालात अभियांत्रिकी व उत्पादन, वित्त आणि लेखा, आरोग्य सेवा आणि लाइफ सायन्स, मानव संसाधन, कायदा, खरेदी आणि पुरवठा साखळी, मालमत्ता आणि बांधकाम, विक्री व विपणन आणि तंत्रज्ञान आदी क्षेत्रांचा आढावा घेतला आहे.
५४% नोकरदार संधीच्या शोधात
मुंबई : नोकरी करत असणारे करिअरच्या नव्या संधी, अधिक वेतनाची नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. परंतु देशातील तब्बल ५४ टक्के कामगारांनी सध्या हातात असलेल्या नोकरी टिकवून ठेवतानाच करिअरच्या नव्या संधी शोधण्यास प्राधान्य दिले आहे. नेवर्किंग संस्था ‘अपनाडॉटको यांनी केलेल्या पाहणीतून हे समोर आले आहे.
पारंपरिक उद्योगांत उत्पादन आणि व्यवस्थापन श्रेणीमध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांना नोकऱ्या दिल्या जात आहेत. डेटा ॲनालिटिक्स, जनरेटिव्ह एआय, मशीन लर्निंगमध्ये कुशल कामगारांना उत्तम संधी मिळणार आहेत.