Join us

'या' शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता वर्षाला 6000 ऐवजी मिळणार 12000 रुपये; सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 10:46 AM

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने केंद्र सरकारच्या पीएम-किसान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेला नमो शेतकरी महासन्मान योजना, असे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षाला 6,000 रुपये देणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली.

ही रक्कम पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 6,000 रुपयांव्यतिरिक्त असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. या योजनेचा लाभ राज्यातील तब्बल एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे अर्थमंत्रीही आहेत. मार्च महिन्यात विधानसभेत सादर करण्यात आलेल्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात त्यांनी ही घोषणा केली होती.

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये - अशा प्रकारे, राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12000 रुपये मिळणार आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आधीपासूनच वार्षाला 6000 रुपये दिले जातात. पीएम किसान योजना 2019 मध्ये सुरू झाली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपये दिले जातात. देशातील तब्बल 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो.  

टॅग्स :शेतकरीमहाराष्ट्रएकनाथ शिंदेभाजपादेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदी