IMF ON Indian Economy: जगभरात मंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून नोकरकपातीचा धडाका लावला आहे. भारताच्या उंबरठ्यावर मंदीचे ढग जमू शकतात, असा कयास बांधला जात आहे. यातच आता मोदी सरकार आपला या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प मांडणार आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकारसाठी जागतिक स्तरावरुन एक चांगली बातमी आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाजूने कौल देत दिलासा दिला आहे.
१ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. मात्र, त्याआधी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMFने भारतासाठी मोठी गुड न्यूज दिली आहे. आयएमएफच्या मते आर्थिक वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. याकाळात भारताच्या विकासाचा वेग ६.१ इतका असेल, तर २०२४ मध्ये ६.८ इतका विकास दर असेल. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असताना दुसऱ्या बाजूला जगाची अर्थव्यवस्था मात्र घसरण्याची शक्यता असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
भारतासाठी आमच्या अंदाजात कोणताही बदल नाही
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अर्थशास्त्रज्ञ आणि संचालकांनी सांगितले की, भारतासाठी आमच्या अंदाजात कोणताही बदल नाही. यावर्षी भारताच्या विकासाचा दर ६.८ टक्के असू शकतो. पुढील वर्षी यात थोडी घट होऊ शकते आणि विकास दर ६.१ इतका राहू शकेल. यात अंतर्गत गोष्टींची भूमिका महत्त्वाची असेल. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारतीय अर्थव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची असेल. भारताची अर्थव्यवस्था जगासाठी प्रेरक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, आशियातील विकसनशील देशांचा विकास दर सन २०२३ मध्ये ५.३ टक्के आणि सन २०२४ मध्ये ५.२ टक्के राहू शकतो. मात्र, चीनचा विकास दर घसरून ४.३ टक्क्यांवर आला होता. सन २०२३ मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसून येतील आणि विकास दर ५.२ टक्क्यांपर्यंत वर जाईल, असेही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"