CNG Price In Mumbai: निवडणूक आयोगाकडून (Election Commission)याच महिन्यात केव्हाही लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर होऊ शकतात. दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच जनतेला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो २.५ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. सध्या जनता महागाईने हैराण झाली आहे. अशा परिस्थितीत सीएनजीच्या दरात झालेली कपात ही जनतेसाठी दिलासा देणारी बाब ठरणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील महानगर गॅसने (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो २.५ रुपयांची कपात केली आहे.
यामुळे करण्यात आली कपात
मंगळवारी उशिरा कंपनीनं यासंदर्भातील निवेदन जारी केलं. गॅसच्या उत्पादन खर्चात कपात केल्यामुळे ही किंमत कमी करण्यात आली असल्याचं कंपनीनं यात म्हटलंय. ही कपात ५ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. गॅसच्या उत्पादन खर्चात कपात झाल्यामुळे येत्या काही दिवसांत देशाच्या इतर भागांमध्येही सीएनजीच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
काय आहेत नवे दर?
सरकारी कंपनी महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीची किंमत प्रति किलो २.५ रुपयांनी कमी केल्यानंतर सीएनजीची किंमत आता ७३.५० रुपये प्रति किलो झाली आहे. एमजीएल मुख्यत्वे देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गॅसचा पुरवठा आणि विक्री करते. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीएनजीच्या किमती कमी झाल्या आहेत, मात्र सध्या देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीत सध्या सीएनजीची किंमत ७६.५९ रुपये प्रति किलो आहे.