Join us

युपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; बँकेत न जाताही जमा करता येणार पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 6:21 PM

युपीआय पेमेंटच्या बाबतीत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज लागणार नाही.

UPI Deposit : तुम्ही युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) वापरत असाल तर तुमच्यासाठी नवीन फीचर आहे. जे लोक पैसे जमा करण्यासाठी बँकेत जातात त्यांच्यासाठी हे फीचर खूप उपयोगी ठरणार आहे. आतापर्यंत तुम्ही युपीआय पेमेंटच्या मदतीने एखाद्याला पैसे पाठवू शकत होतात. पण आता तुम्ही युपीआयच्या मदतीने तुमच्या बँक खात्यातही पैसे जमा करू शकता. त्यामुळे तुम्हाला बँकेत जाण्याची गरज लागणार नाही. केवळ ॲपच्या मदतीने हे काम होणार आहे.

आता युपीआयच्या मदतीने तुमच्या बँक खात्यातही पैसे जमा करता येणार आहेत. यासाठी तुम्हाला आधी तुम्हाला कॅश डिपॉझिट मशीनवर जावे लागेल. तुम्हाला या मशीनवर क्यूआर कोड दिसू लागेल. त्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट जमा करू शकाल. त्यानंतर तुम्हाला युपीआय ॲप उघडावे लागेल. इथे जाऊन तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. युपीआय ॲपवर स्कॅन केल्यानंतर तुम्ही जमा करणार होता तेवढीच रक्कम तुम्हाला दिसेल. शेवटी तुम्हाला पैसे जमा करण्याचे बँक खाते निवडावे लागेल. यामध्ये तुम्ही जो युपीआय पिन वापराल तुमचे पैसे त्याच बँक खात्यात पोहोचतील.

स्टेट बँक ऑफ इंडियाने, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी यासह अनेक बँका आहेत ज्या युपीआयच्या मदतीने पैसे जमा करण्याचा पर्याय देतात. अलीकडे युनियन बँकेनेही हा पर्याय सुरू केला आहे. जे युजर सहज पेमेंट करू इच्छितात त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय यामध्ये अनेक खास फिचर्स देखील देण्यात आले आहेत. यामुळे युजर्संचा बराच वेळही वाचतो.

दुसरीकडे, आजकाल सर्वच ठिकाणी डिजिटल पेमेंटचा खूप प्रचार केला जात आहे. यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर देखील केला जातो. ग्राहकांना जास्तीत जास्त डिजिटल पेमेंट करता यावे यासाठी सरकारकडून विविध योजना आणल्या जातात. नुकतीच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डेलिगेटेड पेमेंट सिस्टम आधारित युपीआय सर्कल सेवा सुरू केली आहे. या सेवेचा शुभारंभ करताना नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सांगितले की या सेवेद्वारे भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली पुढे नेली जाऊ शकते.

युपीआय सर्कलमध्ये दोन प्रकारचे युजर्स आहेत, पहिला प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी युजर्सचे स्वतःचे अकाऊंट आहे, जे सेकंडरी युजर्स जोडू शकतात. प्रायमरी युजर्स त्यावर काही मर्यादा देखील लादू शकतो. यामध्ये, प्रायमरी युजर सेकेंडरी युजरला पूर्ण पेमेंटचा पर्याय द्यायचा की नाही हे ठरवतो. युपीआय सर्कल वापरण्यासाठी प्रायमरी युजरला सेकेंडरी युजरला पासकोड द्यावा लागेल किंवा बायोमेट्रिक तपशील द्यावा लागेल. यामध्ये, प्रायमरी युजरला ५ लोक जोडण्याची मर्यादा आहे. युपीआय सर्कलमध्ये मासिक मर्यादा १५ हजार ठेवण्यात आली आहे. एका दिवसात जास्तीत जास्त ५ हजार रुपये खर्च होऊ शकतो. प्रायमरी युजर प्रत्येक पेमेंटवर लक्ष ठेवू शकतो आणि ते थांबवू शकतो. या फिचरमुळे ज्याचे स्वतःचे बँक अकाऊंट नाही अशा लोकांनाही पेमेंट करण्याची संधी मिळणार आहे.

टॅग्स :बँकएटीएम