Join us

LPG Subsidy Ujjwala Yojana: मोदी सरकारचा मोठा दिलासा! ‘या’ ग्राहकांसाठी LPG सिलेंडर होणार २०० रुपयांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 10:28 AM

LPG Subsidy Ujjwala Yojana:केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

LPG Subsidy Ujjwala Yojana: गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे. पेट्रोल-डिझेलसह गॅसचे दरही गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. यातच आता केंद्रातील मोदी सरकारने LPG सिलेंडर संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे एलपीजी सिलेंडर स्वस्तात मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. 

केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. सरकारने एलपीजी गॅसवर सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलिंडर सबसिडीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर २०० रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली ​आहे. हे अनुदान १४.२ किलोच्या १२ एलपीजी सिलेंडरवर देण्यात येईल. नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू असेल. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

या निर्णयामुळे १.६ कोटी कुटुंबांना फायदा मिळणार

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर २०० रुपये सबसिडी एका वर्षासाठी वाढवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे १.६ कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या झळीतून काहीसा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी एकूण ६,१०० कोटी रुपये आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ७,६८० कोटी रुपयांचा बोजा केंद्र सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सर्व प्रमुख भारतीय तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) २२ मे २०२२ पासून हे अनुदान देत आहेत.

दरम्यान, उज्ज्वला योजनेच्या ९.५९ कोटी लाभार्थ्यांना प्रति वर्ष १४.२ किलो एलपीजी गॅस सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी मिळणार आहे. या योजनेमध्ये सरकारकडून वर्षभरात १२ सिलिंडर देण्यात येतात. उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक सिलिंडरवर २०० रुपयांच्या अनुदान मिळते म्हणजेच केंद्र सरकारकडून एका वर्षात सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना २४०० रुपयांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, १ मार्च २०२३ पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे ९.५९ कोटी लाभार्थी आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :गॅस सिलेंडरकेंद्र सरकार