Rules Change 1 Nov : १ नोव्हेंबर २०२४ पासून देशात अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. यामध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर, क्रेडिट कार्ड आणि यूपीआय सारख्या नियमांचा समावेश आहे, जे थेट सामान्य माणसाशी संबंधित आहेत. अशा वेळी तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं यूपीआय लाइट आणि यूपीआय वॉलेटची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. तर आता यूपीआय लाइट युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी दोन नवे बदल करण्यात आले आहेत.
यूपीआय लाइट ऑटो टॉप-अप फीचर लाँच
डिजिटल पेमेंटचा अनुभव सुधारण्यासाठी यूपीआय लाइटमध्ये दोन महत्त्वाचे अपडेट देण्यात आले आहेत. १ नोव्हेंबर २०२४ पासून यूपीआय लाइट ऑटो टॉप-अप फीचर अंतर्गत यूपीआय लाइट बॅलन्स एका ठराविक मर्यादेपेक्षा कमी असल्यास ते आपोआप टॉप अप केलं जाऊ शकतं. यामुळे मॅन्युअल टॉप-अपची गरज भासणार नाही. ज्यामुळे युनिफाइड पेमेंटइंटरफेस (UPI) लाइटद्वारे डिजिटल पेमेंट सुलभ होईल.
काय म्हटलं एनपीसीआयनं?
या नवीन फीचरसह जेव्हा जेव्हा बॅलन्स त्यांनी निर्धारित केलेल्या किमान मर्यादेपेक्षा कमी होईल तेव्हा यूपीआय लाइटची शिल्लक युझर्सनं निवडलेल्या रकमेतून आपोआप रिलोड होईल, ही रक्कम यूपीआय लाइट बॅलन्स लिमिटपेक्षा अधिक नसेल," असं एनपीसीआयनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे नमूद केलं.
UPI लाईट ट्रान्झॅक्शन लिमिट
गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं यूपीआय लाइट व्यवहाराची मर्यादा ५०० रुपयांवरून १००० रुपये केली आहे. यूपीआय लाइट वॉलेटची मर्यादा २००० रुपयांवरून ५००० रुपये करण्यात आली, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI 123PAY ची प्रति व्यवहार मर्यादा ५,००० रुपयांवरून १०,००० रुपये केली होती.