Join us

खूशखबर... इन्शूरन्स क्लेमसाठी आता खेटे घालायची गरज नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 3:31 PM

इन्शूरन्स क्लेम केल्यानंतर आपला अर्ज अनेक टप्प्यांमधून जात असतो.

ठळक मुद्देइन्शूरन्स क्लेम केल्यानंतर आपला अर्ज अनेक टप्प्यांमधून जात असतो.विमाधारकाला किंवा त्याच्या वारसाला, आपला दावा कुठल्या टप्प्यावर आहे, याची तपशीलवार माहिती समजेल अशी व्यवस्था करण्यास प्राधिकरणाने सांगितलं आहे.

कुठल्याही विम्याचे हप्ते वेळच्या वेळी घेणाऱ्या, उशिरा भरल्यास दंड आकारणाऱ्या विमा कंपन्या विम्याचे दावे (इन्शूरन्स क्लेम) निकाली काढताना ग्राहकांना खेटे मारायला लावतात, असा अनुभव अनेकांना आला असेल. परंतु, आता जुलैपासून आपली या 'फेऱ्या'तून सुटका होणार आहे. विमा नियामक प्राधिकरणानं (IRDA) या संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. विमाधारक किंवा त्यांच्या वारसांना त्यांच्या 'क्लेम'वर सुरू असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती पत्र, फोन, मोबाईल किंवा ई-मेलद्वारे कळवण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. 

इन्शूरन्स क्लेम केल्यानंतर आपला अर्ज अनेक टप्प्यांमधून जात असतो. हेल्थ इन्शूरन्सच्या बाबतीत बऱ्याचदा 'थर्ड पार्टी' कंपनीकडे जावं लागतं. काही कंपन्या विमाधारकांना व्यवस्थित सेवा देतात. परंतु, बऱ्याचदा हक्काचे पैसे मिळवण्यासाठी ग्राहकावर चपला झिजवण्याची वेळही येते. या पार्श्वभूमीवर, ग्राहकांच्या हितांचं रक्षण करण्याच्या दृष्टीने पारदर्शी धोरण राबवण्याचे निर्देश IRDA ने दिले आहेत. विमाधारकाला किंवा त्याच्या वारसाला, आपला दावा कुठल्या टप्प्यावर आहे, याची तपशीलवार माहिती समजेल अशी व्यवस्था करण्यास प्राधिकरणाने सांगितलं आहे.  

इन्शूरन्स क्लेमचा अर्ज आल्यानंतर, एक रेफरन्स नंबर तयार केला जाईल. विमाधारकाचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी त्या नंबरशी जोडलेला असेल. जसजसा क्लेमचा अर्ज पुढे सरकेल, त्यासंबंधीची माहिती विमाधारकाला कळवली जाईल. विम्याचा दावा मंजूर झालाय की नामंजूर, त्याचे पैसे धनादेशाद्वारे दिले जाणार की थेट बँकेत जमा होणार इथपर्यंतची सगळी माहिती कंपनीतर्फे विमाधारकाला किंवा त्याच्या वारसाला कळवली जाईल. समजा, एखाद्या ग्राहकाला आपला क्लेम कुठल्या टप्प्यावर आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तो रेफरन्स नंबरच्या आधारे वेबसाईटवरून माहिती घेऊ शकेल, अशी व्यवस्था केली जाणार आहे.  

फक्त विमादाव्यापुरतीच ही पद्धत न राबवता, सर्वच महत्त्वाच्या सूचना-घडामोडी विमाधारकांना एसएमएस, ई-मेल किंवा पत्राद्वारे कळवण्याची सूचना IRDA ने केली आहे. 

टॅग्स :आरोग्यवैद्यकीय