नवी दिल्ली - जेट एअरवेजमधील कर्मचाऱ्याच्या नोकरीसंदर्भात काळजीत पडलेल्या नातेवाईक आणि नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जेट एअरवेजच्या 100 वैमानिक आणि 450 केब्रिन क्रू सदस्यांना विस्तारा एअरलाइन्सने आपल्या सेवेत सामावून घेतले आहे. विशेष म्हणजे जेटच्या काही विमानांचाही विस्ताराच्या ताफ्यात समावेश करण्याचा विचार सुरू आहे. टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्सच्या संयुक्त भागीदारीतून विस्तारा एअरलाइन्स या विमान कंपनीची उभारणी झाली आहे.
केवळ देशाच्याच नव्हे, तर जगाच्या आकाशात भरारी घेणारी भारतीय विमान कंपनी जेट एअरवेजची सेवा आर्थिक संकटामुळे बंद झाली. 5 मे रोजी सुरू झालेला जेट एअरवेजच्या वैभवशाली वाटचालीचा दुर्दैवी शेवट सगळ्यांनाच चटका लावणारा ठरला. जेटच्या कायमस्वरूपी 'लँडिंग'मुळे तब्बल 22 हजार कर्मचारी एका रात्रीत बेरोजगार झाले आहेत. तर, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे कसे पेलायचे, असा प्रश्न अनेकांपुढे उभा ठाकला आहे. परंतु, आपल्या लाखो प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून झटलेल्या या कर्मचाऱ्यांचा आधार देण्यासाठी सोशल मीडिया पुढे सरसावल्याचे पाहायला मिळाले. ट्विटरवर #Letshelpjetstaff हा हॅशटॅग व्हायरल झाला असून अनेक छोटे-मोठे व्यावसायिक जेटची नोकरी गमावलेल्या तरुण-तरुणींना नोकरीची ऑफर देत होते. जे झालं ते वाईट असलं, तरी त्यानंतरची माणुसकीची झेप नक्कीच दिलासादायक ठरला.
टाटा उद्योग समुहाच्या विस्तारा एअरलाईन्सनेही जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली. जेट एअरवेजच्या 100 वैमानिक आणि 450 केब्रिन क्रू सदस्यांना विस्तारा एअरलाइन्सने आपल्या सेवेत सामावून घेतले आहे. तर, स्पाईसजेटकडून या कर्मचाऱ्यांना नोकरीत रुजू केले जाणार आहे. दरम्यान, जेट कर्मचाऱ्यांसाठी असलेली ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी रद्द होणार असल्याचे जेटकडून मंगळवारी कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले. कर्ज उपलब्ध न झाल्यामुळे मेडिक्लेम पॉलिसीचे हप्ता भरण्यासाठी पैसे नाहीत असे कंपनीकडून सांगण्यात आले. या ग्रुप मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळायच्या. सरकार सध्या जेटचा स्लॉट दुसऱ्या कंपन्यांना देत आहे.