Join us

खूशखबर! येत्या 1 ऑक्टोबरपासून मोबाईल बिल होणार स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 10:14 PM

दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोबाईल इंटरकनेक्शन वापर शुल्क (आययूसी) कमी केल्यामुळे लवकरच फोन कॉलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, दि. 22 - दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोबाईल इंटरकनेक्शन वापर शुल्क (आययूसी) कमी केल्यामुळे लवकरच फोन कॉलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. 14 पैशांवरून ते सहा पैसे प्रतिमिनिट करण्यात आले आहे. या कपातीचा लाभ ग्राहकांना मोबाईल कंपन्यांनी दिल्यास कॉल दर कमी होतील. पोस्टपेड ग्राहकांना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे.

मोबाईल ते मोबाईल टर्मिनेशन शुल्क प्रतिमिनिट 14 पैशांवरून 6 पैसे करण्यात आले आहे. या निर्णयाची 1 ऑक्टोबर 2017 पासून प्रभावीपणे अंमलबजावणी होईल. यासह इतर सर्व प्रकारच्या कॉलवरील (वायर-लाईन टू मोबाईल, वायर-लाईन टू वायर-लाईन) टर्मिनेशन शुल्क आकारणी 1 जानेवारी 2020  पासून पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी माहिती 'ट्राय'ने दिली आहे.

एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर आदी कंपन्यांसाठी 'ट्राय'चा हा निर्णय मोठा झटका मानला जातो. या कंपन्यांनी इंटरकनेक्ट वापर शुल्क दुप्पट म्हणजेच 30 पैसे प्रतिमिनिट करण्यात यावा, अशी मागणी केली होती. तर रिलायन्स जिओने हा चार्ज बंद करण्याची मागणी केली होती. ट्रायच्या या निर्णयाचा फायदा थेट जिओला होण्याची शक्यता आहे. कारण जिओच्या नेटवर्कवरुन एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोनवर मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग कॉल केले जातात. त्यामुळे जिओचा आता आययूसी खर्च कमी होणार आहे.आययूसीची सुरुवात 2003 साली करण्यात आली. इनकमिंग कॉल फ्री झाल्यानंतर ट्रायने कॉल करणाऱ्या ऑपरेटरकडून चार्ज वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला हा चार्ज 15 पैसे प्रती मिनिट ते 50 पैसे प्रती मिनिट होता. ट्रायने 2004 साली हा दर घटवून 20 पैसे प्रती मिनिट केला, तर 2015 मध्ये हा दर 14 पैसे प्रती मिनिट करण्यात आला होता.

टॅग्स :मोबाइल