Join us

आनंदाची बातमी! मोदी सरकारची सर्वसामान्यांना भेट; घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 3:20 PM

पंतप्रधान उज्ज्वला योजनेची सुरुवात २०१६ मध्ये करण्यात आली होती. त्यात सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन दिले होते

नवी दिल्ली – महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात २०० रुपयापर्यंत कपात केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात गॅस सिलेंडर दर कपातीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. सरकारची २०० रुपयांची सब्सिडी उज्ज्वला योजनेतंर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये १०० रुपये कपात केली होती. परंतु घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल झाला नव्हता.

LPG गॅस सिलेंडरचे सध्याचे दर

ऑगस्ट महिन्यात राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचे दर ११०३ रुपये इतके होते. तर मुंबईत सिलेंडरचे दर ११०२ रुपये, कोलकातामध्ये ११२९ रुपये, चेन्नईमध्ये १११८.५० रुपये होते. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजीच्या दरात बदल करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेतंर्गंत घरगुती गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी स्वस्त होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

परंतु केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की, घरगुती गॅस सिलेंडरवरील ही सब्सिडी केवळ उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार आहे. इतर अन्य घरगुती गॅस सिलेंडरवर ही सब्सिडी लागू नसेल. उज्ज्वला योजनेतंर्गत केंद्र सरकार याआधी २०० रुपये सब्सिडी देत होते. त्यात आता अतिरिक्त २०० रुपये सब्सिडी मिळणार आहे. उज्ज्वला योजनेत लाभार्थ्यांना एकूण १ वर्षात १२ घरगुती गॅस सिलेंडरवर सब्सिडीचा लाभ घेता येऊ शकतो.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेची सुरुवात २०१६ मध्ये करण्यात आली होती. त्यात सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन दिले होते. सब्सिडीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक एलपीजी कनेक्शनसोबत लिंक करावा लागेल. सब्सिडीचा लाभ आधार कार्डशी लिंक केल्यावरच मिळणार आहे. मार्च २०२३ पर्यंत सरकारी आकडेवारीनुसार, सरकारने उज्ज्वला योजनेत ९ कोटीहून अधिक मोफत गॅस कनेक्शन दिले आहेत. देशात १४.२ किलो घरगुती एलपीजी दरात शेवटचे १ मार्च २०२३ रोजी बदल झाले होते.

टॅग्स :गॅस सिलेंडरप्रधानमंत्री उज्ज्वला योजना