नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था कोविड-१९ साथीच्या प्रभावातून वेगाने बाहेर येत असून, अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाचे मजबूत संकेत मिळत आहेत. कोविडपूर्व पातळीच्या तुलनेत २२ आर्थिक निर्देशांकांपैकी १९ निर्देशांक तेजीत असल्याचे आढळून आले आहे.
कोविड-१९ साथीच्या उद्रेकानंतर गेल्या वर्षी जानेवारीपासून आर्थिक पुनरुज्जीवनाचे आकलन करण्यासाठी वीज वापर, वस्तू निर्यात, ई-वे बिल यासारख्या उच्च आवृत्ती निर्देशांकांवर (एचएफआय) नजर ठेवली जात आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ताज्या आकडेवारीनुसार, २२ उच्च आवृत्ती निर्देशांकापैकी १९ निर्देशांक पूर्णत: कोविडपूर्व पातळीवर आले आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यात या निर्देशांकांचा स्तर २०१९ च्या याच अवधीतील स्तरापेक्षा अधिक
राहिला. १९ निर्देशांकात १०० टक्क्यांपेक्षा अधिक सुधारणा पाहायला मिळाली आहे. यात ई-वे बिल, वस्तू निर्यात, कोळसा उत्पादन, रेल्वेची माल वाहतूक यांचा समावेश आहे.
निर्देशांकांच्या प्रगतीवरून असे दिसून येते की, या काळात अर्थव्यवस्थेचे केवळ पुनरुज्जीवनच झाले असे नव्हे; तर आर्थिक वृद्धीही कोविडपूर्व पातळीपेक्षा अधिक गतिमान राहिली आहे. चालू वित्त वर्षातील दुसऱ्या तिमाहीतील सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) वाढीच्या दर अनुमानाचे आकडे याला पुष्टी देणारे आहेत. दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर २०२१) आर्थिक वाढीचा दर आदल्या वर्षाच्या या अवधीच्या तुलनेत ८.४ टक्के अधिक राहिला आहे.
इलेक्ट्रॉनिक पथकर (टोल) संकलन ऑक्टोबरमध्ये १०८.२ कोटी रुपये राहिले. कोविडपूर्व स्तराच्या तुलनेत ते १५७ टक्के अधिक आहे. यूपीआयवरील व्यवहार चारपट वाढून ४२१.९ कोटी रुपये झाले. वस्तूंची आयात ५५.१४ अब्ज डॉलर राहिली. मागील वर्षाच्या तुलनेत ती १४६ टक्के अधिक आहे. ई-वे बिल दुपटीने वाढून ७.४ कोटी रुपये झाले. कोळसा उत्पादन १३१ टक्क्यांनी वाढून ११.४१ कोटी टन झाले. रेल्वे मालवाहतूक १२५ टक्क्यांनी वाढली.