ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - परदेश दौऱ्यावर गेलेल्यांना सतावत असलेली मोठी चिंता म्हणजे त्यांचे रोमिंग बिल. दौरा आटोपून मायदेशात परत आल्यावर आपल्याला अव्वाच्या सव्वा मोबाइल बील तर येणार नाही ना याची काळजी बऱ्याच जणांना वाटत असते. मात्र यंदाच्या उन्हाळ्याच्या सुटीत परदेश दौरा आटोपून येणाऱ्यांचे मोबाईल बिल त्यांचे बजेट बिघडवणार नाहीत. भारती एअरटेल, व्होडाफोन इंडिया यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या इंटरनॅशनल रोमिंग पॅकमध्ये बदल केला आहे. त्यामुळे गेल्यावर्षी अमेरिकेत एक आठवडा वास्तव्यादरम्यान आलेल्या मोबाईल बिलाच्या तुलने यावर्षी एका आठवड्याचे बिल 90 टक्यांनी कमी येणार आहे.
या संदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने प्रकाशित केले आहे. नव्या इंटरनॅशनल रोमिंग पॅकमध्ये टेलिकॉम ऑपरेटर ग्राहकांना अनलिमिटेड डेटा, व्हाइस कॉल आणि फ्री इनकमिंग कॉल यांचे एकत्रित पॅक घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. टेलिकॉम क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेमुळे कॉलिंग कार्ड कंपनी मेट्रिक्सने गेल्यावर्षी टॅरिफमध्ये 25 टक्क्यांनी कपात केली होती. इतर कंपन्यांच्या तुलनेत 25 टक्के स्वस्त रेट देत असल्याचे या कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना फायदा होत आहे.
याबाबत टेलिकॉम लि़डर प्रशांत सिंघल म्हणाले, "सर्व लोकप्रिय रोमिंग ठिकाणांवर डेटा चार्ज 650 रुपये प्रति एमबीवरून घटून तीन रुपये एमबीपर्यंत आले आहेत. जर ग्राहक एक आठवड्यासाठी अमेरिकेत गेला तर 10 मिनिटे इनकमिंग कॉल , 10 मिनिटे लोकल कॉल , 10 मिनिटे देशाबाहेर कॉल आणि दररोज 5 तास इंटरनेटचा वापर केल्यास स्टँडर्ड रेटनुसार एकूण बील 1 लाख रुपये येऊ शकते. मात्र नव्या दरांमुळे हे बिल घटून 10 हजार रुपये येऊ शकते."