नवी दिल्ली- तुम्ही जर छोटछोट्या स्वरूपात गुंतवणूक करत असाल, तर मोदी सरकारनं तुम्हाला एक खूशखबर दिली आहे. केंद्र सरकार पब्लिक प्रॉव्हिडंट फंड(PPF)सारख्या इतर छोट्या स्वरूपातील योजनांमध्ये केलेली गुंतवणूक मुदतीपूर्वीच काढण्याची मुभा दिली आहे. केंद्र सरकारनं सादर केलेल्या बजेटमध्ये यासाठी एक तरतूद केली आहे. त्यात सर्व छोट्या योजनांना एका कायद्यांतर्गत आणण्यात येणार असून, 1 एप्रिल 2018पासून या तरतुदींची अंमलबजावणी होणार आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अॅक्ट 1968ची जागा आता गव्हर्नमेंट सेव्हिंग्ज प्रमोशन अॅक्ट घेणार आहे. त्याच दरम्यान गव्हर्नमेंट सेव्हिंग्ज बँक अॅक्ट 1873 रद्द होऊ शकते. या कायद्यानुसार आर्थिक चणचण असताना व्यक्तीला छोट्या स्वरूपातील गुंतवणुकीतील पैसे काढता येणार आहेत. पीपीएफ खात्याला 15 वर्षांची मुदतबंद ठेव अशी कालमर्यादा असते. तर दुस-या योजनांवरही मर्यादित मुदत दिलेली असते. त्या योजनांमधून पैसे काढण्यासाठी फार वेळ खर्ची पडतो. त्यामुळे शक्यतो लोक अशा योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतात.परंतु केंद्र सरकारच्या या नव्या नियमानुसार तुम्हाला मर्यादेच्या पूर्वीसुद्धा पैसे काढता येणार आहेत. नव्या कायद्यानुसार पालकांनाही स्वतःच्या अपत्यांसाठी छोटछोट्या योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीला संरक्षण देता येणार आहे. तसेच अल्पवयीनांनाही स्वतःचा वारस निवडण्याचा अधिकार मिळणार आहे. छोट्या योजनांसंदर्भात उद्भवणा-या वादाचा निपटारा करण्यासाठी लोकपालची व्यवस्था प्रस्तावित आहे. जेणेकरून योग्यरीत्या याबाबतच्या अडीअडचणी दूर होतील. या कायद्यांतर्गतच एक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच सरकारच्या या कायद्यात त्यांच्या सोयीनुसार त्यांना बदल करण्याचीही सुविधा मिळणार आहे.
खूशखबर ! आता मुदतीपूर्वीच काढता येणार PPF खात्यामधून पैसे ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 6:05 PM