नवी दिल्ली - डिजिटल पेमेंट फर्म पेटीएम (Paytm) ने आपला आयपीओ आणण्यापूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या अॅपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या ट्रान्झॅक्शनवर कॅशबॅक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कंपनीने ५० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. डिजिटल इंडियाला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने ऑनलाइन ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी तयारी केली आहे. ( Good news! Paytm pays Rs 50 crore cashback, who can avail the benefit? Find out)
त्यासाठी कंपनीने २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्राथमिक स्तरावर ऑनलाइन व्यवहार सुरू करण्याची योजना आखली आहे. जेणेकरून व्यावसायिकांना डिजिटल पेमेंट करण्यासाठी प्रशिक्षण देता येईल. तसेच कॅशलेस पेमेंट पद्धतीचा स्वीकार करण्यासाठी रिवॉर्ड देता येतील. कंपनी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणामध्ये विशेष अभियान चालवणार आहे.
याबाबत पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी सांगितले की, भारताने आपल्या डिजिटल इंडिया मिशनमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सर्व मजबूत झाले आहेत. डिजिटल इंडिया यशस्वी बनवण्यात ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे अशा देशातील आघाडीच्या व्यावसायिकांना पेटीएम निश्चित कॅशबॅक देते.
शेखर यांनी सांगितले की, दिवाळूपूर्वी पेटीएम अॅपच्या माध्यमातून सर्वाधिक ट्रांझॅक्शन करणाऱ्या व्यावसायिकांना कॅशबॅकबरोबरच साऊंड बॉक्स आणि आयओटी डिव्हाईससुद्धा मोफत दिले जातील. भारतामध्ये डिजिटल इंडिया मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जुलै २०१५ मध्ये सुरू केली होती. भारताला डिजिटली मजबूत करणे हे ही मोहीम सुरू करण्यामागचे लक्ष्य होते.