नवी दिली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभारात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल प्रतिलीटर दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत.
नोव्हेंबर २०१४ पासून जानेवारी २०१६ पर्यंत नऊ वेळा एक्साइज ड्युटी वाढवली होती. त्याच काळापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्यास सुरुवात झाली होती. पंधरा महिन्यांमध्ये सरकारने पेट्रोलवरील एक्साइज ड्युटी ११.७७ रुपयांनी तर डिझेलवरील ड्युटी १३.४७ रुपयांनी वाढवली होती. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत करापोटी मिळणारा महसूल दुपटीने वाढला. गेल्या वर्षी सरकारला २ लाख ४२ हजार कोटी रुपये मिळाले होते. सरकारने बेसिक एक्साइज ड्युटीमध्ये दोन रुपयांची कपात करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
पेट्रोल, डिझेल घरपोच मिळेल - धमेंद्र प्रधान गेल्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेल घरपोच मिळेल, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी ट्वीट केले होते. घराघरात पेट्रोल आणि डिझेलची ऑनलाइन विक्री लवकरच सुरू करू शकू, असे प्रधान यांनी म्हटले. मात्र, या त्यांच्या ट्वीटनंतर नेटिझन्सनी त्यांच्यावर टिका करण्यास सुरुवात केली. डिझेल आणि पेट्रोल घरपोच मिळालच तर आग लागण्याच्या घटना घडतील, असे अनेकांनी भीती व्यक्त केली. तर, पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर आधी निम्म्यावर आणा, अशी सूचना ट्वीटर यूजर्सनी केली. हे सगळे पेट्रोल-डिझेलचे वाढलेल्या दरावरुन लक्ष हटवण्यासाठी केले जात आहे, असे ट्विटरवर म्हटले. तसेच, ट्विटरवरुन अनेकांनी या पेट्रोल, डिझेल विक्रीच्या निर्णयाची खिल्ली उडवली.