नवी दिल्ली गेल्या पाच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, डिसेंबरमध्ये त्यात कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाचे दर घसरले असून, ते सरासरी ८० डॉलर्स प्रतिबॅरलवर आले आहेत. त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेल कंपन्या इंधनदरात कपात करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी सांगितले की, सोमवारी ब्रेंट क्रूडचा दर घसरून ८१.५३ डॉलर प्रतिबॅरलवर आला. टेक्सास क्रूडचा दर ७४.३९ डॉलरवर आला आहे.चीनमध्ये कोरोना साथीचा नव्याने उद्रेक झाल्याचे वृत्त आल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरातही घसरण झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. कोरोना साथीमुळे चीनमध्ये लॉकडाउन लावण्यात आले आहे. त्यामुळे तेथील उद्योग आणि व्यवसाय होऊन इंधनाची मागणी घटली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्चे तेल उतरत आहे.
महाग इंधनामुळे महागाईचा भडका
देशात पेट्रोल-डिझेलचे दर २२ मार्च रोजी वाढण्यास सुरुवात झाली होती. तेव्हा १४ वेळा दरवाढ झाली होती. त्यातून दोन्ही इंधन १० रुपयांनी महागले होते. त्यामुळे देशात महागाईचाही भडका उडाला होता.
५ महिन्यांपासून पेट्रोल- डिझेलचे दर स्थिर
> कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असताना भारतात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली नाही.> सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे राहिले. विशेष म्हणजे सलग ५ महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे आता दर कपात करण्यास मोठा वाव आहे, असे जाणकारांचे मत आहे.> वास्तविक १ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ११५.५० रुपयांची कपात करण्यात आली होती.> घरगुती वापराच्या म्हणजेच स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आला नाही. पेट्रोल-डिझेलच्या दरात याआधीचा शेवटचा बदल २१ मे २०२२ रोजी करण्यात आला होता.> तेव्हा केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क ८ रुपयांनी, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क ६ रुपयांनी कमी केले होते.