नवी दिल्ली : मधुमेहींसाठी आवश्यक असलेल्या १२ औषधींच्या किमतीवर राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) नियंत्रण आणले असून, या औषधींच्या किमती आता कंपन्यांना वाढविता येणार नाहीत.
एनपीपीएने समाजमाध्यमांवर यासंबंधीची माहिती जारी केली. संस्थेने म्हटले आहे की, मधुमेहावरील १२ औषधींच्या किमतीवर कमाल मर्यादा घालण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक किमती कंपन्या वाढवू शकणार नाहीत. या औषधांत ग्लिमप्राइड टॅबलेटस्, ग्लुकोज इंजेक्शन आणि इंटरमीडिएट ॲक्टिंग इन्सुलिन सोल्युशन्स यांचा समावेश आहे.
मधुमेहावरील औषधी स्वस्त असावीत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्लिमप्राइडच्या १ मि. ग्रॅ. टॅबलेटची किंमत ३.६ रुपयांपेक्षा अधिक असणार नाही. २ मि. ग्रॅ. टॅबलेटची किंमत ५.७२ रुपयांपेक्षा असणार नाही. १ मि. लि. ग्लुकोज इंजेक्शनची (२५ % ) किंमत १७ पैसे असेल, तसेच १ मि. लि. इन्सुलिन इंजेक्शनची किंमत १५.०९ रुपये असेल.
मेटाफार्मिन नियंत्रणासाठीच्या १०० मि. ग्रॅ. टॅबलेटची किंमत ३.०६६ रुपये असेल. ७५० मि. ग्रॅ. साठी २.४ रुपये, तर ५०० मि. ग्रॅ. साठी १.९२ रुपये असा दर असेल. करनाल येथील भारती हॉस्पिटलचे एंडोक्राइनो लॉजिस्ट डॉ. संजय कालरा यांनी सांगितले की, भारतात मधुमेहींची संख्या ७.७ कोटी आहे.