नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने त्यांच्या गृहकर्ज धारकांसाठी खूशखबर आणली आहे. जुन्या कर्जधारकांना हा लाभ मिळणार असून आरबीआयने रेपो दरात कपात केल्याचा फायदा ग्राहकांना देण्याचा विचार बँक करत आहे.
एसबीआयच्या जुन्या ग्राहकांच्या मासिक हप्त्यामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. बँक जुन्या ग्राहकांना रेपो लिंक्ड लेंडिंग रेटवर कर्ज देऊ शकते. बँकेला आशा आहे की, सरकार सुस्त पडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही उपाय करत असेल तर दुसऱ्या तिमाहीमध्ये ग्राहकांची मागणी वाढेल.
देशातील मोठ्या बँकेने जुलैमध्ये रेपो लिंक्ड लेंडिंग रेटची सुरुवात केली होती. याचा फायदा केवळ नवीन ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला होता. यातून बँकेच्या नव्या ग्राहकांना व्यक्तीगत दरांमध्ये कपातीचा फायदा मिळत होता. यामुळे जुन्या ग्राहकांनाही व्यक्तीगत दरांमध्ये कपातीचा फायदा मिळवून देण्याचा विचार असल्याचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट 5.40 टक्के असून एसबीआय त्यावर 2.25 टक्के वाढवून लेंडिंग रेट 7.65 एवढा होतो. यावर RLLRवर 40 बेसिस पॉईंट आणि 55 बीपीएस स्प्रेड लावला जातो. यामुळे नव्या कर्जदारांना 8.05 ते 8.20 टक्क्यांच्या दराने गृहकर्ज मिळू शकते. सध्या बँक 75 लाखांपर्यंतचे कर्ज 8.35 ते 8.90 टक्के दराने देते.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?बँकांकडे शिल्लक राहिलेली रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रकमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. हा रिव्हर्स रेपो रेट बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचं काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिक्विडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँक रिव्हर्स रेपो रेट वाढवते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वतःच्या रकमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.
रेपो रेट म्हणजे काय?बँकांची मोठ्या रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो, तोच रेपो रेट. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्जं देतात. परंतु, हे दर वाढले तर बँकांचं कर्जही महाग होतं आणि त्याचा फटका ग्राहकांना बसतो.