दिवाळीच्या आधी देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेने (SBI) ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. बँकेने एमसीएलआरचे दर 0.10 टक्क्यांनी घटविले असून नवे दर उद्यापासून लागू होणार आहेत. सध्याच्या आर्थिक वर्षात ही सलग सहावी कपात आहे.
एसबीआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना फायदा मिळवून देणअयासाठी बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर दर 0.10 टक्क्यांनी कमी केले आहेत. आत पुढील वर्षापर्यंत हे दर 8.15 टक्क्यांवरून 8.05 टक्क्यांवर आले आहेत. 10 ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू होतील.
देशाची रिझर्व्ह बँक आरबीआयने 4 ऑक्टोबरला अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याज दरात कपात केली आहे. याआधी पाचवेळा कपात केली होती. आरबीआच्या बैठकीत रेपो दरामध्ये 25 आधार अंक घटवून 5.15 टक्के केला होता. यामुळे या वर्षातील कपातीचा आकडा 135 अंकावर गेला आहे. आधी हे दर 5.40 टक्के होते. नऊ वर्षांत पहिल्यांदाच रेपो दर एवढा कमी झाला आहे. रिव्हर्स रेपो दर 4.90 टक्के आणि बँक रेट 5.40 टक्के झाला आहे.
बँकिंग क्षेत्रामध्ये सुसूत्रता ठेवणाऱ्या आरबीआयने एक एप्रिल 2016 मध्ये मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंगच्या आधारे एमसीएलआरची सुरुवात केली होती. याआधी सर्व बँका बँक आधार दरावर ग्राहकांसाठीचा व्याजदर ठरविला जात होता.