लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०२०-२१ आर्थिक वर्षाचे प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतर विवरण भरल्यास दंड आकारण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांनी विवरण भरताना जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठांसाठी विशेष सवलती मिळतात. प्राप्तिकरातून अतिरिक्त सूट मिळतेच, त्याशिवाय गुंतवणूक व इतर परताव्यातही जास्त सवलती मिळतात. त्या जाणून घेणे खूप आवश्यक आहे.
केवळ पेंशन आणि बँकेच्या व्याजावर अवलंबून असलेल्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तिकर विवरण भरण्याची गरज नाही. मात्र, इतर स्रोतातून उत्पन्न असल्यास त्यांना विवरण भरावे लागेल.
वैद्यकीय विम्यावर लाभ
५० हजार रुपयांपर्यंत वैद्यकीय विमा याेजनेच्या प्रीमियमवर कलम ८० डी अंतर्गत सूट मिळते. इतर नागरिकांसाठी ही मर्यादा २५ हजार रुपये आहे. याशिवाय कलम ८० डीबीअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना काही ठरावीक आजारांवरील उपचारांच्या खर्चावर १ लाख रुपयांपर्यंत सवलत मिळते. इतरांसाठी ही मर्यादा ४० हजार रुपयांचीच आहे.
करमुक्त उत्पन्नाची मर्यादा
- ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच कुठलाही टीडीएस कापलेला नसल्यास प्राप्तिकर विवरण भरण्याची गरज नाही. याशिवाय अति ज्येष्ठ म्हणजेच ८० वर्षांहून अधिक वय असलेल्यांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५ लाख रुपये आहे. या मर्यादेत वार्षिक उत्पन्न असल्यास त्यांनाही प्राप्तिकर विवरण भरण्याची गरज नाही.
- ज्येष्ठ नागरिकांना बचत खाते आणि मुदत ठेवींवर मिळालेल्या व्याजावर ५० हजार रुपयांपर्यंत कर लागत नाही. इतरांसाठी ही मर्यादा १० हजार रुपये आहे.