Jobs in IT Sector: टेक-आयटी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यासांठी मोठी बातमी आहे. आगामी काळात या क्षेत्रात 50,000 नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. सरकारने IT हार्डवेअरसाठी नवीन उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत Dell, HP, Flextronics आणि Foxconn सह 27 कंपन्यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे या क्षेत्रात तरुणांना रोजगाराची मोठी संधी आहे.
लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटर, सर्व्हर आणि अतिशय लहान उपकरणांचा या योजनेत समावेश आहे. या योजनेतून अंदाजे 3,000 कोटी रुपयांची वाढीव गुंतवणूक अपेक्षित आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या योजनेमुळे 3.5 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पादन होईल आणि 50,000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि 1.5 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल.
जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची तयारी
हे पाऊल अशा वेळी आले आहे, जेव्हा भारत आयटी हार्डवेअर कंपन्यांना धोरणात्मक आकर्षणे आणि प्रोत्साहन योजनांसह आकर्षित करत आहे आणि उच्च-तंत्र उत्पादनासाठी जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, PLI IT हार्डवेअर योजनेअंतर्गत 27 कंपन्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी जवळपास 95 टक्के म्हणजेच 23 कंपन्या पहिल्या दिवसापासून उत्पादन सुरू करण्यास तयार आहेत. येत्या 90 दिवसांत 4 कंपन्या उत्पादन सुरू करतील.
3000 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार
ते पुढे म्हणाले, या 27 कंपन्यांकडून सुमारे 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या मंजुरीमुळे पीसी, सर्व्हर, लॅपटॉप आणि टॅब्लेटसह आयटी हार्डवेअरच्या निर्मितीमध्ये भारत एक प्रमुख शक्ती म्हणून स्थापित होईल. IT हार्डवेअर योजनेंतर्गत मंजूर झालेल्या मोठ्या नावांमध्ये Dell, Foxconn, HP, Flextronics, VVDN आणि Optimus यांचा समावेश आहे. ग्रीन सिग्नल मिळालेल्या इतर अर्जदारांमध्ये पॅजेट इलेक्ट्रॉनिक्स, SOJO मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस, गुडवर्थ, निओलिंक, सिरमा SGS, मेगा नेटवर्क्स, Panash DigiLife आणि ITI Limited यांचा समावेश आहे.