कोरोनाच्या दुसर्या लाटेचा मोठा फटका भारताला बसला होता. कोरोनाबाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. दरम्यान, या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लस हा एक चांगला पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. जास्तीत जास्त लोकांना लवकरच लसी दिली जावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत प्रयत्न करत आहेत. आता बर्याच बँकासुद्धा या मोहिमेत सामील झाल्या आहेत. ज्या लोकांचं लसीकरण झालं आहे त्यांना एफडीवर अधिक व्याज दिलं जाईल असं अनेक बँकांकडून जाहीर करण्यात आलं आहे. ही ऑफर केवळ मर्यादित काळासाठी आहे.
ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असेल आणि त्यांनी ९९९ दिवसांसाठी एफडी केली तर त्यांना अतिरिक्त ३० बेसिस पॉईंट्स दिले जातील, असं UCO बँकेनं म्हटलं आहे. पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार ही ऑफर ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे.
सेंट्रल बँकेनंही नुकतीच 'इम्यून इंडिया डिपॉझिट स्कीम' लाँच केली होती. या अंतर्गत ११११ दिवसांसाठी एफडीवर २५ अतिरिक्त बेसिस पॉईंट्स देत आहे. याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त लाभ देण्यात येत आहे. लसीकरणाला चालना देण्यासाठी बँकेनं 'इम्यून इंडिया डिपॉझिट स्कीम' लाँच केली असल्याचं बँकेनं ट्विटरद्वारे सांगितलं.
To encourage Vaccination under COVID 19, Central Bank of India launches Special Deposit Product “Immune India Deposit Scheme” for 1111 days at an attractive extra Interest rate of 25 basis points above the applicable card rate for Citizens who got Vaccinated.#Unite2FightCoronapic.twitter.com/MKEJaHgMpE
— Central Bank of India (@centralbank_in) April 12, 2021
सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत २३.५९ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी २१ जून पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.