पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील अनेक कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली. यामध्ये गुगलची (Google) मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) आणि अॅमेझॉनचे अँड्र्यू जॅसी (Andrew Jassy) यांचा समावेश होता. गुगलने भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये १० अब्ज डॉलर्स गुंतवण्याची घोषणा केली. मोदींची डिजिटल इंडियाची दृष्टी इतर देशांसाठी ब्लू प्रिंट असू शकते, असं वक्तव्य पिचाई यांनी यावेळी केलं.
याशिवाय गुगलनं गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर सुरू करण्याची घोषणाही केली आहे. दुसरीकडे, यामुळे भारतात रोजगार वाढण्यास आणि छोट्या आणि मध्यम कंपन्यांचे डिजिटायझेशन करण्यात मदत होणार असल्याची प्रतिक्रिया अॅमेझॉनकडून देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान भेटणं हा माझ्यासाठी सन्मान आहे. गुगल भारताच्या डिजिटायझेशन फंडात १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. याशिवाय, कंपनी गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उघडणार असल्याचं वक्तव्य पिचाई यांनी केलं.
पंतप्रधानांची दृष्टी दूरदर्शी
"डिजिटल इंडियासाठी पंतप्रधानांची दृष्टी दूरदर्शी आहे. इतर देशही ही ब्ल्यू प्रिंट स्वीकारणार आहेत. गुगलला भारतात एक सिंगल युनिफाईड एआय मॉडेल तयार करायचंय, जे १०० पेक्षा अधिक भारतीय भाषा हाताळण्यात सक्षम असेल. हा कंपनीच्या ग्लोबल प्रयत्नांचा एक भाग आहे. या अंतर्गत कंपनीला जगातील १००० भाषा ऑनलाइन आणायच्यात. यामुळे आपल्या आवडीच्या भाषांमध्ये लोकांना माहिती मिळू शकेल. आयआयटी मद्रासमध्ये रिस्पॉन्सिबल एआयसाठी एका नव्या सेंटरलाही कंपनी मदत करत आहे," असं पिचाई म्हणाले.
#WATCH | Google CEO Sundar Pichai after meeting PM Modi, says "It was an honour to meet PM Modi during the historic visit to the US. We shared with the Prime Minister that Google is investing $10 billion in India's digitisation fund. We are announcing the opening of our global… pic.twitter.com/ri42wI3Adv
— ANI (@ANI) June 23, 2023
काय म्हणाले अँड्र्यू जॅसी?
जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे सीईओ अँड्र्यू जॅसी आणि बोइंगचे सीईओ डेव्हिड एल कॅलाहान यांनीही मोदींची भेट घेतली. कॅलाघन यांनी बोलताना पंतप्रधान मोदींना भारताचा मोठ्या प्रमाणात विकास करायचा असल्याचं म्हटलं. त्यांना एरोस्पेस आणि एव्हिएशनमध्ये प्रचंड रस आहे. त्यांच्याकडे मोठी दृष्टी आहे. भारत विमान वाहतूक आणि एरोस्पेसमध्ये मोठी भूमिका बजावू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आपली कंपनी भारतात अतिरिक्त नोकऱ्या निर्माण करण्यास मदत करेल, असे पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर जॅसी म्हणाले. आम्हाला अधिक नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत. छोट्या आणि मध्यम कंपन्यांना डिजिटायझेशनमध्ये मदत करायची आहे आणि भारतीय वस्तू जगात निर्यात करायच्या असल्याचंही त्यांनी नमूद केलं.