Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुगलने बातम्यांद्वारे मिळविले ४.७ अब्ज डॉलरचे उत्पन्न

गुगलने बातम्यांद्वारे मिळविले ४.७ अब्ज डॉलरचे उत्पन्न

माध्यम समुहांच्या उत्पन्नाला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 07:17 AM2019-06-11T07:17:27+5:302019-06-11T07:17:57+5:30

माध्यम समुहांच्या उत्पन्नाला मोठा फटका

Google earns $ 4.7 billion of revenue from the news | गुगलने बातम्यांद्वारे मिळविले ४.७ अब्ज डॉलरचे उत्पन्न

गुगलने बातम्यांद्वारे मिळविले ४.७ अब्ज डॉलरचे उत्पन्न

वॉशिंग्टन : २0१८ मध्ये गुगलने सर्च आणि बातम्या याद्वारे तब्बल ४.७ अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळविले आहे. गुगलने माध्यम समूहांच्या आॅनलाईन जाहिरातींचा मोठा भाग स्वत:कडे ओढून घेतला आहे. त्यामुळे अनेक माध्यम समूहांच्या उत्पादनात घट झाली आहे.

न्यूज मीडिया अलायन्स (एनएमए) या संस्थेने केलेल्या एका अभ्यासात ही माहिती देण्यात आली आहे. ही संस्था अमेरिकेतील २ हजार वृत्तपत्रांचे प्रतिनिधित्व करते. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ‘एनएमए’चे अध्यक्ष डेव्हिड चॅवेर्न यांनी म्हटले आहे की, बातम्या हा गुगलच्या उत्पन्नाचा मोठा भाग आहे. पत्रकारांनी उभ्या केलेल्या बातम्यांच्या मजकुरातून गुगलला ४.७ अब्ज डॉलरचा ‘कट’ मिळाला आहे.
‘एनएमए’ने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, कॅलिफोर्नियास्थित बलाढ्य इंटरनेट कंपनीने सर्च आणि गुगल न्यूज याद्वारे ४.७ अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळविले आहे. अमेरिकेतील सर्व माध्यम समूहांचा डिजिटल जाहिरातींद्वारे मिळालेला एकत्रित महसूल ५.१ अब्ज डॉलर आहे. गुगलने मिळविलेला महसूल जवळपास एवढाच आहे. या महसुलात गुगलकडून गोळा करण्यात येणाऱ्या ग्राहकांच्या वैयक्तिक डाटाचे मूल्य गृहीत धरलेले नाही. प्रत्येक ग्राहकाच्या क्लिकच्या माध्यमातून हा डाटा गुगलला मिळतो.

‘फिलाडेल्फिया इन्क्वायरर’ या वृत्तपत्राच्या मालक कंपनीचे मुख्य कार्यकारी टेरेन्स सी झेड इगर यांनी सांगितले की, प्लॅटफॉर्म्स आणि माध्यम उद्योग यातील सध्याचे संबंध उद्ध्वस्त करणारे आहेत. गुगलच्या ट्रेंडिंग विचारणांमधील ४0 टक्के क्लिक बातम्यांसाठी असतात. गुगल बातम्यांचा जो मजकूर वापरते त्यासाठी ती काहीही खर्च करीत नाही. जगभरातील माध्यम समूहांच्या हेडलाइन्स गुगलकडून जशास तशा वापरल्या जातात.

Web Title: Google earns $ 4.7 billion of revenue from the news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.