शार्क टँक इंडियाचे (Shark Tank India) जज आणि शादी डॉट कॉमचे (shaadi.com) संस्थापक अनुपम मित्तल यांनी गुगलचा उल्लेख डिजिटल ईस्ट इंडिया कंपनी असा केलाय. अनुपम मित्तल यांनी गुगलच्या (Google) नवीन पेमेंट नियमांवर ट्विटरवर टीका केली आणि गुगलचे नवीन धोरण भारतीय स्पर्धा आयोगाच्या (CCI) निर्देशांचे उल्लंघन करणारे असल्याचंही म्हटलं. गुगलनं भारतीय ॲप डेव्हलपर्सना भारताच्या बाहेर त्यांच्या गुगल बिलिंग सिस्टमचा वापर अनिवार्य केला आहे, तसंच असं न केल्यास १४ दिवसांच्या आत ॲप गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
“गुगलनं भारतीय डेव्हलपर्सना आपली पेमेंट सिस्टम अनिवार्य केली आहे. हे भारतीय नियमांचं उल्लंघन आहे,” असं अनुपम मित्तल यांनी ट्वीटद्वारे म्हटलं. माध्यमं, न्यायालयं आणि पंतप्रधान कार्यालय याची दखल घेतील अशी अपेक्षाही व्यक्त कर त्यांनी गुगलला डिजिटल युगातील ईस्ट इंडिया कंपनी म्हटलं.
Received a call from @Google today mandating their payments for Indian developers in continued violation & disregard of @CCI_India orders & Indian laws. Neo-colonialism at its worst! Hope the media,
— Anupam Mittal (@AnupamMittal) April 20, 2023
courts & @PMOIndia 🇮🇳 are taking note … the Digital East India Co is here
काय आहे प्रकरण?
सीसीआयच्या नियमांमुळे गुगलला भारतात आपली बिलिंग सिस्टम जीपीबीएसला युझर चॉईस बिलिंग सिस्टमध्ये बदलावी लागली. जीपीबीएस अंतर्गत सर्व ॲप्सना खरेदीच्या पेमेंटसाठी गुगल पेमेंट गेटवे अंतर्गत करावं लागतं आणि यासाठी कंपनी प्रत्येक खरेदीवर ३० टक्के कमिशन आकारते. तर यूसीबीएस २६ एप्रिल पासून लागू होऊ शकते. या अंतर्गत सर्वच प्रकारचे प्रर्याय जसं कार्ड, नेट बँकिंग, युपीआय किंवा वॉलेट उपलब्ध असतील. तसंच ३० टक्क्यांऐवजी २६ टक्क्यांपर्यंत कमिशन द्यावं लागणार आहे.
समस्या कुठे?
दरम्यान, गुगलनं यावर तोडगा शोधून काढला आहे. भारताबाहेर कोणत्याही ॲपचा वापर जसं अमेरिका, युरोपमध्ये होत असेल तर त्यासाठी कंपनी आपल्या पेमेंट गेटवेचा वापर अनिवार्य करत आहे. अशातच हे भारतीय कायद्यांच्या विरोधात असल्याचं मत अनुपम मित्तल यांनी व्यक्त केलंय.