google nuclear power plant : दिग्गज टेक कंपनी गुगल माहिती नाही, असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. गुगलशिवाय आपलं पानही हालत नाही. गुगलची Gmail सेवा तर आपलं डिजिटल ओळखपत्र मानले जाते. या ओळखपत्राशिवाय अनेक ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळवणं अशक्य आहे. मात्र, हीच गुगल कंपनी आता एकदोन नाही तर तब्बल ७ प्रगत अणुऊर्जा प्रकल्प बांधणार आहे. यासाठी कंपनीने करार केला असून २०३५ पर्यंत हे प्रकल्प उभारण्याची योजना आहे. पण, टेक कंपनीला अणुउर्जाचं काय काम? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. यामागे मोठी योजना आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात तंत्रज्ञान कंपन्यांच्या विस्तारामुळे ऊर्जेची मागणीही वाढू लागली आहे. जगातील सर्वात मोठी टेक कंपनी Google ने देखील ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी Kairos Power सोबत एक महत्त्वपूर्ण करार केला आहे. या करारानुसार गुगल २०२५ पर्यंत ७ प्रगत अणुऊर्जा प्रकल्प बांधणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या उर्जा मागण्या पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपनी लहान अणुभट्ट्यांच्या विकासात माहिरहा करार स्वच्छ आणि विश्वासार्ह मार्गाने ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाला गती देणारा असल्याचे गुगलच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. तर हा करार कैरोस पॉवरसाठी व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे कैरोसचे कार्यकारी जेफ ओल्सन यांनी सांगितले. कैरोस कंपनी लहान अणुभट्ट्यांच्या विकासामध्ये माहिर आहे. जे पारंपारिक आण्विक संयंत्रांप्रमाणे पाण्याऐवजी वितळलेल्या फ्लोराईड सॉल्टचा कुलेंट म्हणून वापर करतात. जुलैमध्ये, कंपनीने टेनेसीमध्ये प्रात्यक्षिक अणुभट्टीचे बांधकाम सुरू केले.
एआय आणि स्वच्छ ऊर्जेची मागणीएआय तंत्रज्ञान विकसित होत असल्याने, डेटा सेंटरसाठी विजेची मागणी वेगाने वाढत आहे. एआय डेटा सेंटर्स केवळ सिस्टीमला उर्जा देण्यासाठी विजेची गरज नसते. तर उपकरणे थंड ठेवण्यासाठी देखील प्रचंड ऊर्जा आवश्यक आहे. ही डेटा सेंटर्स विशेष हार्डवेअरने सुसज्ज असून त्यांना चालवण्यासाठी भरपूर उर्जा लागते. त्यामुळे खूप उष्णता निर्माण होते
गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार, या दशकाच्या अखेरीस जागतिक डेटा केंद्रांचा ऊर्जेचा वापर दुप्पट होण्याची शक्यता आहे. या वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी, तंत्रज्ञान कंपन्या अणुऊर्जेकडे आकर्षक पर्याय म्हणून पाहत आहेत, कारण ती कार्बनमुक्त आणि २४/७ वीज पुरवते.