नवी दिल्ली : डिजिटल व्यवहारांमध्ये क्रांती घडवणाऱ्या यूपीआयला (UPI) ग्राहकांसाठी दररोज अधिक सुलभ करण्यात येत आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना यूपीआयचा वापर करता येईल. यूपीआयद्वारे पेमेंट सेवा प्रदान करणार्या गुगल पे (Google Pay) या अॅपने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, आता युजर्स आधार क्रमांक वापरून अॅपवर UPI सेवा सक्रिय करू शकतात.
ही सुविधा सुरू केल्यानंतर, आता Google Pay युजर्स आपल्या डेबिट कार्डशिवाय त्यांचा UPI पिन सेट करू शकतात. परंतु युजर्स या सुविधेचा वापर तेव्हाच करू शकतात, जेव्हा त्यांचा मोबाईल क्रमांक, बँक खाते आणि आधार नंबर एकमेकांशी लिंक असेल. Google Pay ने एक निवेदन जारी केले आहे की, हे फीचर UPI वापरत असलेल्या करोडो भारतीयांना आणि इतर अनेक युजर्सना UPI सेट करण्यासाठी मदत करेल.
आता मिळतील दोन ऑप्शन
गुगल पे अॅपवर हे फीचर आणल्यानंतर आता युजर्सना अकाउंट सक्रिय करण्यासाठी दोन पर्याय दिले जातील. पहिल्या ऑप्शनमध्ये युजर्स आपले अकाउंट केवळ डेबिट कार्डद्वारे सक्रिय करू शकतात किंवा दुसऱ्या ऑप्शनमध्ये युजर्सचे अकाउंट त्यांच्या आधार नंबरसोबत सक्रिय करू शकतात. युजर्स या दोन ऑप्शनपैकी एक निवडू शकतात.
UPI द्वारे झाले 941 कोटी व्यवहार
गेल्या आठवड्यातच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ताजी आकडेवारी जाहीर करताना सांगितले होते की, मे महिन्यात एकूण 941 कोटी व्यवहार UPI द्वारे झाले आहेत. तसेच, जर आपण या व्यवहारांचे मूल्य पाहिले तर केवळ मे महिन्यात UPI द्वारे 14.3 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत, जे एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 37 टक्के अधिक आहे, असे NPCI ने सांगितले.