Join us

देशात गुगल स्ट्रीट व्ह्यू सुरू, जाणून घ्या काय आहे सेवा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:22 PM

मॅपमध्ये दिसणार वेग, रस्त्याचा ३६० डिग्री व्ह्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तुम्ही प्रवासादरम्यान गुगल मॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.  गुगलने गुगल मॅपमध्ये स्ट्रीट व्ह्यू फीचर जोडले असून,  रस्त्यांचे आणि सार्वजनिक इमारतींचे ३६० अंशातील व्ह्यू पाहता येणार आहेत. यामुळे प्रवासात आता वेगळीच अनुभूती येणार आहे.

काय आहे सेवा? या फीचरमुळे आता घरी बसून कोणत्याही ठिकाणाचा अनुभव घेता येईल. मॅपमुळे पोलिसांच्या मदतीने वेग मर्यादा, रस्ते बंद आहेत की चालू, सुरू असलेले काम पाहता येणार आहे. या वैशिष्ट्याची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. कंपनीने १५ वर्षांपूर्वी याला अमेरिकेत सादर केले होते.

कोंडी फुटणार?गुगलने रस्ता सुरक्षा उपायांसह वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणांसोबत सहकार्य करण्याची घोषणा केली आहे. सेफ ड्रायव्हिंगसाठी मॅप वाहतूक अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या वेग मर्यादा दाखवेल.

किती शहरांमध्ये सुविधा? सध्या हे फिचर बंगळुरूमध्ये सुरू करण्यात आले असून, हळूहळू १० शहरांमध्ये उपलब्ध करण्यात येईल. यात सुरुवातीला दीड लाख किलोमीटरचे रस्ते समाविष्ट असतील. या वर्षाच्या अखेरीस ५० शहरांमध्ये ही सुविधा विस्तारित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. 

हे नवीन फीचर नेमके आहे काय? गुगल स्ट्रीट व्ह्यू हे असे तंत्रज्ञान आहे जे गुगल मॅप्स आणि ॲपच्या मदतीने रस्त्यांवरील विविध ठिकाणांची माहिती मिळते. हे तंत्रज्ञान २००७मध्ये अमेरिकेत वापरले गेले.सध्या जगभरात अनेक ठिकाणी हे फिचर वापरले जाते.

कसे वापरणार

स्ट्रीट व्ह्यू वापरण्यासाठी तुम्हाला गुगल मॅप हे ॲप उघडावे लागेल. त्यानंतर ज्याठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणच्या रस्त्यावर झूम वाढवावे. स्थानिक कॅफे किंवा इतर ठिकाणी तुम्ही यामुळे आरामात जाऊ शकता. या वैशिष्ट्यामुळे अचूक ठिकाणी जाण्यास मदत होईल.

टॅग्स :रस्ते वाहतूकगुगल