नवी दिल्ली : गुगलची ‘तेज’ या नावाची युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आधारित डिजिटल पेमेंट सेवा १८ सप्टेंबर रोजी भारतात सुरू होत आहे. भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्यात आता गुगलचा प्रवेश होत आहे.
दिल्लीत १८ सप्टेंबर रोजी गुगलच्या ‘तेज’चे लाँचिंग होत आहे. आम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. याचाच एक भाग म्हणून आम्ही भारतात आमचे नवे उत्पादन सादर करीत आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. गुगलच्या ‘नेक्स्ट बिलियन युजर्स’ पुढाकाराचे उपाध्यक्ष सिझर सेनगुप्ता यांच्या उपस्थितीत ‘तेज’ सेवेचा शुभारंभ होणार आहे. ‘तेज’ हे ‘मेक इन इंडिया’ उत्पादन असून, ‘अँड्रॉईड पे’प्रमाणे ते काम करणार आहे.
तेज हा हिंदी शब्द असून, त्याचा अर्थ आहे गती. गतिमान सेवेचे प्रतीक म्हणून हे नाव गुगलने निवडले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
यूपीआय ही पेमेंट सिस्टीम नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने (एनपीसीआय) लाँच केली आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून ती चालवली केली जाते. मोबाइल प्लॅटफॉर्मवर दोन बँक खात्यांत पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा ही सिस्टीम उपलब्ध करून देते.
भारतातील झपाट्याने वाढणाºया डिजिटल पेमेंट बाजारात आणखी काही बड्या कंपन्या उतरत आहेत. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉटस्अॅपचा त्यात समावेश आहे. यूपीआय आधारित इंटरफेस प्लॅटफॉर्म विकसित करीत असल्याची घोषणा व्हॉटस्अॅपने याआधीच केली आहे. आपली ही सेवा सुरू करण्यासाठी व्हॉटस्अॅपकडून एनपीसीआय आणि काही बँकांशी चर्चा सुरू असल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते.
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार यूपीआय सिस्टीमचा वापर करून बँक-टू-बँक पैसे हस्तांतरित करण्याची व्यवस्था व्हॉटस्अॅप निर्माण करीत आहे. वुई चॅट आणि हाइक मेसेंजर यासारख्या काही मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून याआधीच पैसे हस्तांतरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तिपटीने वाढ
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रातील पायाभूत सुविधा २०१७ मध्ये तिपटीने वाढणार आहे. सुमारे पाच दशलक्ष ‘इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल’ (पीओएस) मशीन बसविली जाण्याची अपेक्षा आहे.
डिजिटल पेमेंट क्षेत्रात गुगलची उडी, 18 सप्टेंबरला भारतात होणार सुरू
गुगलची ‘तेज’ या नावाची युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आधारित डिजिटल पेमेंट सेवा १८ सप्टेंबर रोजी भारतात सुरू होत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 12:03 AM2017-09-15T00:03:43+5:302017-09-15T00:04:09+5:30