Join us

ॲपवरून कर्ज देणाऱ्या कंपन्यांना गुगलचा चाप!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 6:23 AM

२०५ मोबाइल ॲपची नोंदणी रद्द : नोंदणीसाठी रिझर्व्ह बँकेचा परवाना सक्तीचा

- मनोज गडनीसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मोबाइल ॲपवरून कर्ज घेणाऱ्या लोकांचे ब्लॅकमेलिंग करण्याच्या घटना वाढत आहेत. त्याची गुगलनेही दखल घेतली असून, या ॲप कंपन्यांना रिझर्व्ह बँकेचा परवाना सादर करणे बंधनकारक केले आहे, तसेच गुगलने संशयास्पद वाटणाऱ्या २०५ ॲपना सर्व्हरवरून काढून टाकले आहे. कंपनीने आपल्या ब्लॉगवरून याची घोषणा केली आहे. 

मोबाइल ॲपद्वारे कर्ज वितरण करणाऱ्या कंपन्यांना गुगल प्लेस्टोअरवर आपली नोंदणी करताना आता भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज वितरणासाठी दिलेला परवाना अपलोड करणे सक्तीचे केले आहे, तसेच बिगर बँकिंग वित्तीय संस्थांनादेखील त्यांच्या कंपनीचे प्रमाणपत्र देणे सक्तीचे केले आहे. ज्या वित्तीय कंपन्यांनी आपल्या कर्ज वितरणासाठी त्रयस्थ कंपन्यांची नेमणूक केलेली आहे, त्यांच्यासोबतचा करार किवा जाहीरनामादेखील सादर करणे बंधनकारक केले आहे. 

मोबाइल ॲपद्वारे कर्ज घेतलेल्या लोकांकडून कर्ज वसुली करताना मुद्दलच्या दुप्पट किंवा चौपट वसुली होत असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तसेच जे लोक अशा वसुलीस नकार देत आहेत, त्यांच्या फोनमधील डेटा ॲप कंपन्यांच्या ताब्यात असल्यामुळे अशा लोकांचे ब्लॅकमेलिंगदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशाच ब्लॅकमेलिंगला कंटाळून गेल्या आठवड्यात कांदिवलीतील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. उपलब्ध माहितीनुसार, ॲपद्वारे कर्ज वितरण आणि ब्लॅकमेलिंगला बळी पडण्याच्या देशात सुमारे तीन हजार घटना गेल्या सहा महिन्यांत उजेडात आल्या आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजे ५७२ घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. 

टॅग्स :गुगल