केंद्र सरकारने टेलिकॉम कंपन्यांना २८,२०० मोबाइल हँडसेट ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय या हँडसेटशी संबंधित २० लाख मोबाइल क्रमांकांची पुन्हा पडताळणी करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. यासंदर्भात दूरसंचार मंत्रालयाने १० मे रोजी निवेदन जारी केलं आहे. सायबर क्राईम आणि आर्थिक फसवणुकीत मोबाइल फोनचा गैरवापर रोखण्यासाठी दूरसंचार विभाग गृह मंत्रालय आणि राज्य पोलिसांसोबत मिळून काम करत असल्याचं त्यांनी यात म्हटलंय.
फसवणुकीचं नेटवर्क नष्ट करणं आणि नागरिकांना डिजिटल धोक्यांपासून वाचविणं हे या विभागांचे एकत्रित प्रयत्न आहेत, असं मंत्रालयानं म्हटलंय. गृह मंत्रालय आणि राज्य पोलिसांनी केलेल्या विश्लेषणानुसार सायबर गुन्ह्यांमध्ये २८ हजार २०० मोबाइल हँडसेटचा गैरवापर करण्यात आला आहे.
पडताळणीच्या सूचना
दूरसंचार विभागाच्या विश्लेषणानुसार या मोबाइल हँडसेटसोबत २० लाख क्रमांकांचा वापर करण्यात आला. यानंतर दूरसंचार विभागानं टेलिकॉम कंपन्यांना भारतभरातील २८,२०० मोबाइल हँडसेट ब्लॉक करण्याचे आणि या हँडसेटशी जोडलेल्या २० लाख मोबाइल कनेक्शनची पुन्हा पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पडताळणीत अपयशी ठरल्यास कंपन्यांनी कनेक्शन तोडण्याचे निर्देशही दूरसंचार विभागानं दिले आहेत. सायबर क्राईमच्या बाबतीत विभागानं हे पाऊल उचललं आहे. दूरसंचार विभागाने ७ मे रोजी आर्थिक घोटाळ्यात वापरलेला फोन नंबर डिस्कनेक्ट केला होता. तसंच त्या क्रमांकाशी जोडलेले २० मोबाइल हँडसेटही ब्लॉक करण्यात आल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.