नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) खातेधारकांना एका मेसेजबाबत सरकारने सावध केलं आहे. सरकारी एजन्सी पीआयबीने एक एडवाइजरी जारी केली आहे. ग्राहकांना त्यांचे बँक अकाउंट ब्लॉक केले जाईल, असे मेसेज येत आहेत. अशा एसएमएस आणि कॉल्सला उत्तर देऊ नये, असं सरकारनं म्हटलं आहे. तसेच एसबीआय खातेधारकांना अशा एसएमएसमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये व असा मेसेज आल्यास त्वरित डिलीट करण्यास सांगितलं आहे.
पीआयबीने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. तुमचं एसबीआय बँक खातं ब्लॉक केलं जाईल, असा मेसेज फेक आहे. ट्विटमध्ये अशा बनावट मेसेजचा फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. सरकारने बँकेच्या ग्राहकांना सावध करत म्हटलं आहे की, खासगी अथवा बँकिंग माहिती शेअर करण्यास सांगणाऱ्या ईमेल/एसएमएसला उत्तर देऊ नये. जर तुम्हाला अशा प्रकारचे मेसेज आल्यास त्वरित report.phishing@sbi.co.in वर रिपोर्ट करा.
पीआयबीने ट्विटमध्ये ग्राहकांना येणाऱ्या या बनावट मेसेजची माहिती दिली आहे. या फेक एसएमएसमध्ये म्हटलं आहे की, ‘प्रिय ग्राहक, तुमचे SBI BANK डॉक्यूमेंट एक्सपायर झाले आहेत. तुमचं अकाउंट ब्लॉक होईल. अकाउंट सुरू करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: https://sbikvs.ll.’ दरम्यान, ही लिंक बनावट आहे. याआधी देखील एसबीआयने आपल्या ग्राहकांना सावध केलं आहे.
केवायसीच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या फसवणुकीबाबत बँकेने ग्राहकांना सावध केलं होतं. यामध्ये केवायसीच्या नियमांचे पालन न केल्याने एसबीआय अकाउंट बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, बँकेकडून वेळोवेळी ग्राहकांना अशा बनावट मेसेजबाबत सावध केलं जातं. त्यामुळे कोणत्याही बनावट मेसेज अथवा लिंकला उत्तर देऊ नये. बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर करू नये. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.