Share Market : केंद्र सरकारने 23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केलेल्या एका घोषणेमुळे बुधवारी(दि.24) कोळंबी/झिंगे व्यवसायाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. बुधवारी या कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांनी वधारले. यामध्ये अवंती फीड्स, वॉटरबेस लिमिटेड, एपेक्स फ्रोझन फूड्स, झील एक्वा आणि मुक्का प्रोटीन्सच्या शेअर्सचा समावेश आहे.
बुधवारी अवंती फीड्सचे शेअर्स जवळपास 20 टक्क्यांनी वाढून 764.40 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. तर, दिवसाअंती 14 टक्क्यांनी वाढून 736 रुपयांवर बंद झाला. विशेष म्हणजे, अवंती फीड्सच्या शेअरे गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल 45,000 टक्के परतावा दिला आहे. अवघ्या 1 रुपयांवरुन हा शेअर 764 रुपयांपर्यंत पोहोचला. ही वाढ सुमारे 14 वर्षांत झाली आहे. 8 जानेवारी 2010 रोजी कंपनीचे शेअर्स 1.63 रुपयांवर होते, जे आज 736 रुपयांवर आले.
गेल्या पाच दिवसांत प्रचंड वाढ
गेल्या पाच दिवसांत अवंती फीड्सच्या शेअर्समध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत त्यात 68.27% वाढ झाली आहे. तसेच, सहा महिन्यांत 44 टक्के आणिवा गेल्या एका महिन्यात 19 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
अर्थसंकल्पात घोषणा अन् हे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले
वॉटरबेस लिमिटेडचा शेअरदेखील बुधवारी 20 टक्क्यांनी वाढून 102 रुपयांवर पोहोचला. तर, एपेक्स फ्रोझन फूड्सचे शेअर्सदेखील 20 टक्क्यांच्या वाढीसह 311.75 रुपयांवर आले. याशिवाय, झील एक्वाचे शेअर्सदेखील 10 टक्क्यांच्या उसळीसह 15.35 रुपयांवर पोहोचले आहेत.
अर्थसंकल्पात काय घोषणा करण्यात आली?
निर्मला सितारन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, कोळंबीच्या शेतीसाठी वित्तपुरवठा करण्यात येणार आहे. कोळंबीच्या वाढीसाठी न्यूक्लियस प्रजनन केंद्रांचे जाळे निर्माण करण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल. त्याची निर्मिती, प्रक्रिया आणि निर्यातीसाठी नाबार्डच्या माध्यमातून हा वित्तपुरवठा होईल.
(टीप- कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञाचा सल्ला घ्या.)