Aadhar Pancard News : आधारकार्ड आणि पॅनकार्ड धारकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका खासगी वेबसाईटने ३ कोटींहून अधिक नागरिकांची संवेदनशील माहिती विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या प्रकरणाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. नागरिकांच्या आधार आणि पॅन कार्ड तपशीलांसह संवेदनशील माहिती उघड करणाऱ्या काही वेबसाइट ब्लॉक केल्या आहेत. सरकारने अधिकृत निवेदनात ही माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला (CERT-In) या वेबसाइट्समध्ये सुरक्षा त्रुटी आढळल्या होत्या. त्यानंतर सरकारने या वेबसाइट्स ब्लॉक करण्यासाठी पावले उचलली आहेत.
निवेदनानुसार, “काही वेबसाइट्स आधार आणि पॅन कार्ड तपशीलांसह भारतीय नागरिकांची संवेदनशील वैयक्तिक माहिती उघड करत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. सुरक्षित सायबर सुरक्षा पद्धती आणि वैयक्तिक डेटाच्या संरक्षणाला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याने ही बाब गांभीर्याने घेतली गेली आहे. या सर्व बेवसाईट्स ब्लॉक करण्याची कारवाई करण्यात आली आहे."
वेबसाईट्समध्ये आढळल्या सुरक्षेच्या त्रुटीभारतीय युनिक आयडेंटिफिकेशन प्राधिकरणाने (UIDAI) आधार (आर्थिक आणि इतर अनुदान, लाभ आणि सेवांचे वितरण) कायदा, 2016 अंतर्गत ही कारवाई केली आहे. या काद्यानुसार आधारशी संबंधित तपशील सार्वजनिकपणे प्रदर्शित करण्यास मनाई करणाऱ्या तरतुदीचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, “CERT-In ला या वेबसाइट्सच्या विश्लेषणातून काही सुरक्षा आढळल्या. "संबंधित वेबसाइट मालकांना त्यांच्या स्तरावर आयसीटी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि या त्रुटी भरून काढण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे."
तुमचा डेटा लीक झाला तर काय करावे?आयटी कायद्यांतर्गत, कोणताही पीडित पक्ष तक्रार दाखल करण्यासाठी आणि नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी निर्णायक अधिकाऱ्याकडे जाऊ शकतो. राज्यांच्या आयटी सचिवांना निर्णय घेणारे अधिकारी म्हणून अधिकार देण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात, एका सायबर सुरक्षा संशोधकाने दावा केला होता की एका इन्शुरन्स अधिकाऱ्यांनी ३.१ कोटी ग्राहकांचा डेटा विकला होता.