Government Company IPO : नवरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) येत्या एक-दोन वर्षांत आयपीओ आणणार आहे. देशातील रिन्यूएबल एनर्जी क्षमता वाढविणं हा त्याचा उद्देश आहे. एसईसीआयचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आरपी गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. ५०० गिगावॅटचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम केलं जात असून ते साध्य केले जाईल, असंही ते म्हणाले. भारतानं २०३० पर्यंत ५०० गिगावॅट रिन्यूएबल एनर्जी क्षमता साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
कंपनी पुढील एक-दोन वर्षांत शेअर बाजारात लिस्ट होऊ इच्छित असल्याची प्रतिक्रिया गुप्ता यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पांसाठी निविदा काढण्यासाठी न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयाची नोडल एजन्सी असल्यानं एसईसीआयची स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंगदेखील महत्त्वपूर्ण आहे. एसईसीआय इतर देशांना रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात विस्तार करण्यास मदत करेल, असंही गुप्चा म्हणाले.
NTPC Green Energy देखील आयपीओ आणणार
नुकताच महारत्न सीपीएसई एनटीपीसी ग्रीन एनर्जीनं आयपीओद्वारे १०,००० कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट सादर केला आहे. ही कंपनी एनटीपीसीची रिन्यूएबल एनर्जी युनिट आहे. आयपीओमध्ये फक्त नवीन शेअर्स जारी केले जातील. या इश्यूमधून मिळणाऱ्या रकमेपैकी ७,५०० कोटी रुपये एनटीपीसी ग्रीन एनर्जीची उपकंपनी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचे थकीत कर्ज अंशत: किंवा पूर्णपणे फेडण्यासाठी वापरले जातील. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी खर्च केली जाणार आहे.