गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात झालेल्या घसरणीनंतर शुक्रवारी शेअर बाजारात पुन्हा उत्साह दिसून आला. दरम्यान, या घसरणीतही सरकारी कंपनीच्या शेअरनं मात्र गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला. हा शेअर म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) या कंपनीचा. शुक्रवारी कामकाजादरम्यान कंपनीचा शेअर १६.६७ टक्क्यांनी वाढून २८४.२० रुपयांवर पोहोचला होता. तर गेल्या सहा महिन्यांमध्ये या शेअरनं जवळपास १६५ टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेत सहाय्यक कंपनी
रेल विकास निगमनं नुकत्याच दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. रेल विकास निगमच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी ५६.१५ रुपये आहे. रेल विकास निगम लिमिटेडनं (RVNL) दक्षिण आफ्रिकेत RVNL इन्फ्रा साउथ आफ्रिका ही उपकंपनी स्थापन केली आहे. याशिवाय, सरकारी कंपनी रेल विकास निगमनं सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये व्यावसायिक शक्यता शोधण्यासाठी जॅक्सन ग्रीन प्रायव्हेट लिमिटेडसोबत संयुक्त उपक्रमही सुरू केलाय. या संयुक्त उपक्रमात रेल विकास निगम लिमिटेडचा ४९ टक्के आणि जॅक्सन ग्रीनचा ५१ टक्के हिस्सा आहे.
वर्षभरात २६० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी
गेल्या एका वर्षात रेल विकास निगम लिमिटेडच्या (RVNL) शेअर्समध्ये २६० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. १८ जानेवारी २०२३ रोजी सरकारी रेल्वे कंपनीचे शेअर्स ७८.१५ रुपयांवर होते. १९ जानेवारी २०२४ रोजी रेल विकास निगमचे शेअर्स २८४.५० रुपयांवर पोहोचले. गेल्या ६ महिन्यांत सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये १६५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)