नवी दिल्ली : केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून ३ लाख ६० हजार कोटी नको आहेत. याबद्दलची माहिती चुकीची आहे. सरकार केवळ बँकेची योग्य आर्थिक चौकट आखण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे केंद्रीय वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी टिष्ट्वटद्वारे स्पष्ट केले आहे.विविध मुद्यांवरुन बँक व सरकारमधील वाद विकोपाला गेला असताना केंद्राने बँकेला त्यांच्याकडील अतिरिक्त रोख मागितल्याचे वृत्त होते. पण गर्ग यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत दोन दिवसांनी सरकारची बाजू स्पष्ट केली. केंद्राचे देशाच्या तिजोरीसंबंधी आर्थिक गणित सुयोग्य आहे. त्यामुळे वित्तीय तूट भरुन काढण्यासाठी बँकेला ३.६० लाख कोटी किंवा १ लाख कोटी मागण्याचा सरकारचा कुठलाही प्रस्ताव नाही. याबाबतचे वृत्त चुकीचे आहे, असे गर्ग म्हणाले. ते म्हणाले की, वित्तीय तूट जीडीपीच्या अधिकाधिक ३.३० टक्के ठेवण्याचे केंद्राचे लक्ष्य आहे. ही तूट त्यापेक्षा अधिक नसेल. हे लक्ष्य केंद्र मार्च २०१९ पर्यंत निश्चितच गाठेल.
‘आरबीआयचे ३ लाख ६० हजार कोटी सरकारला नकोत’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 4:50 AM