नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने गेल्या काही वर्षांत गंगाजळी आणि जोखीम म्हणून ठेवून घेतलेले २७,३८० कोटी रूपये अर्थ मंत्रालयाने मागितले आहेत, असे सूत्रांकडून समजते.
रिझर्व्ह बँकेने २०१६-२०१७ वर्षात १३,१९० कोटी रूपये गंगाजळी व जोखीम म्हणून ठेवून घेतले होते. ती रक्कम २०१७-२०१८ वर्षात १४,१९० कोटी रूपये झाली. चालू आर्थिक वर्षासाठी मागील आर्थिक वर्षाप्रमाणे अंतरिम अतिरिक्त रक्कम उपलब्ध करून द्यावी आणि २०१६-२०१७ आणि २०१७-२०१८ च्या वर्षाप्रमाणे राखून ठेवलेली अतिरिक्त रक्कम हस्तांतरीत करावी अशी विनंती अर्थ मंत्रालयाने केली.बँकेने चालू आर्थिक वर्षात ४० हजार कोटी रूपये आधीच हस्तांतरीत केलेले आहेत. सरकारची विनंती रिझर्व्ह बँकेने मान्य करून २८ हजार कोटी त्याला दिले तर आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये एकूण अतिरिक्त रक्कम ६८ हजार कोटी होईल. पुढील आर्थिक वर्षात ६९ हजार कोटींचान लाभांश अपेक्षित आहे. रिझर्व्ह बँक, राष्ट्रीकृत बँका व आर्थिक संस्थांकडून सरकारने पुढील वर्षात ८२,९११ कोटी मिळावेत, असे ठरवले आहे.