Join us

सरकारचं आणखी एक मोठं गिफ्ट, आता ग्रॅच्युइटीवर मिळणार जास्त फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 4:30 PM

सरकारनं छोट्या छोट्या योजनांवर व्याजदर वाढवल्यानंतर आता आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे.

नवी दिल्ली- सरकारनं छोट्या छोट्या योजनांवर व्याजदर वाढवल्यानंतर आता आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, गैर-सरकारी प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीवरचे व्याजदर 7.6 टक्क्यांवरून वाढवून 8 टक्के करण्यात आले आहेत. नवे व्याजदर 31 डिसेंबर 2018च्या तिमाहीसाठी लागू असणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालयानं 4 ऑक्टोबरला स्पेशल डिपॉझिट स्कीम (एसडीएस) 1975च्या अंतर्गत संशोधन करून हे नवे व्याजदर लागू केले आहेत. काय होणार याचा फायदा- एसडीएसचे व्याजदर वाढवल्यानं गैर-सरकारी पीएफ, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीवर निश्चित स्वरूपात जास्त फायदा मिळण्यास मदत होणार आहे. या फंडांमध्ये गुंतवणूक करणा-या कर्मचारी आणि लाभार्थ्यांना मोठ्या कालावधीसाठी फायदा मिळणार आहे. परंतु त्यांना सरकार आणि गुंतवणुकीच्या निर्देशांचं पालन करावं लागेल. त्यामुळे आता नोकरी करणा-यांना ग्रॅच्युइटीवर जास्त फायदा मिळणार आहे. काय असतं एसडीएस- केंद्र सरकारनं जमा योजनांवर व्याजदर ठरवण्यासाठी एसडीएसला 1 जुलै 1975ला सुरुवात केली आहे. या योजनेचा उद्देश गैर सरकारी पीएफ, पेन्शन, ग्रॅच्युइटी फंड, जीवन विमा निगम(एलआयसी)साठी असलेले फंड आणि कर्मचा-यांना जास्त परतावा मिळवून देण्याचा आहे. जेव्हा या फंडांमध्ये गुंतवणूक केली जाते, तेव्हा सरकार त्यातील रकमेवर व्याज देत असते.  

व्याजदर वाढले- 31 मार्च 2018च्या तिमाहीत व्याजदर 7.6 टक्के होतं. तर जून आणि सप्टेंबर तिमाहीमध्ये व्याजदर 7.6 टक्के होते. सरकारनं आता व्याजदर वाढवून 8 टक्के केले आहेत. 

टॅग्स :पैसा