Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तसेच पारदर्शकता राखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून कडक पावलं उचलली जात आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, झारखंड विधानसभा निवडणूक आणि १५ विधानसभा पोटनिवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने बँका, शेअर बाजार बंद राहणार आहेत. याशिवाय मद्याची दुकानंही बंद राहणार आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही रजा देण्यात आलेली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रात निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला बँका बंद राहणार आहेत. बँकांच्या शाखा सुरू नसल्या तरी एटीएम, यूपीआय सेवा आणि ऑनलाइन बँकिंग सारख्या डिजिटल बँकिंग सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. म्हणजेच ग्राहकांना आपलं महत्त्वाचं काम ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून हाताळता येणार आहे.
शेअर बाजार बंद
राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) २० नोव्हेंबर रोजी बंद राहतील. म्हणजेच शेअर्स, डेरिव्हेटिव्हज आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग (एसएलबी) सेगमेंटमध्ये ट्रेडिंग होणार नाही. निवडणुकीसंदर्भातील निर्बंध लक्षात घेता शेअर बाजाराला सुट्टी देण्यात आली आहे.
कमॉडिटी मार्केटच्या वेळा बदलल्या
कमॉडिटी मार्केटच्या ट्रेडिंग टाइममध्येही २० नोव्हेंबर ला बदल करण्यात आला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) सकाळच्या सत्रात म्हणजेच सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत बंद राहिल. सायंकाळच्या सत्रात नेहमीप्रमाणे सायंकाळी ५ ते ११.५५ या वेळेत व्यवहार होणार आहेत. निवडक शेतमालाला रात्री ९ वाजेपर्यंत विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय नॅशनल कमॉडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज (NCDEX) दिवसभर बंद राहणार असून २० नोव्हेंबरला संपणारे करार १९ नोव्हेंबरलाच प्री-पोन करण्यात आले आहेत.