नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत औषधांची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी औषधांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर भारत सरकारने निर्बंध घातले आहेत. औषधनिर्मितीसाठीचे २६ प्रकारचे अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियन्टस् (घटक), अॅन्टिबायोटिक्स, व्हिटॅमिन्स व हार्मोन्स यांचे विविध फॉर्म्युलेशन्स यांचा त्यात समावेश आहे.औषधी घटकांच्या निर्यातीवरील निर्बंध तात्काळ लागू केले आहेत. चीनच्या हुबेई प्रांतातून औषधांचा कच्चा माल प्रामुख्याने भारतात आयात होतो. नेमका हाच प्रांत चीनमधील कोरोना विषाणूच्या साथीचे केंद्र आहे.चीन सरकारने तो प्रांत जणू बंदच केला आहे. तिकडून येणारा सर्व पुरवठा थांबला आहे. या पार्श्वभूमीवर औषधांच्या कच्चा मालाच्या निर्यातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय सरकारने घेतला. याची अधिसूचना विदेश व्यापार महासंचालकांनी जारी केली आहे. त्यानुसार, २६ प्रकारचे एपीआय त्याचप्रमाणे पॅरासिटोमॉल, टिनिडाझोल, मेट्रोनायडॅक्झोल, व्हिटॅमिन्स बी१, बी६, बी१२, हार्मोन प्रॉगेस्टरनॉन, क्रोमाफेनिकॉल व ओर्निडाझोल आदी फॉर्म्युलेशन्सच्या निर्यातीवर निर्बंध आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. औषधनिर्माण विभागाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने ही शिफारस केली होती.>पुरवठा साखळी विस्कळीतऔषध निर्मितीतील आवश्यक एपीआय, इंटरमिडिएटस् अथवा की स्टार्टिंग मटेरिअल्स (केएसएम) यांच्यावर सरकार लक्ष ठेवून आहे. चीनमधून आयात होणाºया या घटकांची पुरवठा साखळी कोरोना विषाणूच्या साथीमुळे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेणे भाग होते. सन २०१८-१९ मध्ये ६७.५६ टक्के मोठी औषधे आणि औषधी घटक चीनमधून आयात करण्यात आले. यांची किंमत २,४०५.४२ दशलक्ष डॉलर होती.
२६ प्रकारच्या औषधी घटकांच्या निर्यातीवर सरकारने घातले निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 4:51 AM