Plastic Straw Ban: केंद्रातील मोदी सरकार प्लास्टिक स्ट्रॉवर पूर्णपणे बंदी घालण्याच्या तयारीत आहे. 1 जुलैपासून यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल, अशी घोषणा सरकारने यापूर्वीच केली होती. यानंतर, सरकारच्या या निर्णयावर अनेक कंपन्यांनी आक्षेपही नोंदवला होता.
कुणावर होणार मोठा परिणाम -
सरकारच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम पॅक्ड ज्यूस आणि डेअरी प्रोडक्ट्सवर (Dairy Products) होईल. यासंदर्भात नुकतेच डेअरी ग्रुप अमूलने (Amul) सरकारला पत्रही लिहिले आहे. अमूलने पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात "प्लास्टिक स्ट्रॉवर घालण्यात येणारी बंदी काही काळासाठी टाळण्यात यावी," असे म्हटले आहे. याच बोरोबर, सरकारच्या या निर्णयाचा जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक (Milk Producer) देशातील शेतकरी आणि दूध विक्रीवर नकारात्मक परिणाम होईल, असा तर्क अमूलने दिला आहे.
...तर देशातील 10 कोटी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल -
PMO ला लिहिलेल्या पत्रात अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी म्हणाले, प्लास्टिकच्या स्ट्रॉमुळे दूधाची विक्री वाढण्यास मदत होते. याशिवाय, प्लॅस्टिक स्ट्रॉवरील बंदीचा निर्णय काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावा. यामुळे देशातील 10 कोटी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. माध्यमांतील वृत्तांनुसार, प्लास्टिक स्ट्रॉ हे कमी वापरले जाणारे उत्पादन आहे. याच्या ऐवजी पेपर स्ट्रॉचीही निर्मिती होऊ शकते. देशात 5 ते 30 रुपयांपर्यंतच्या ज्यूस आणि दुधाच्या प्रोडक्ट्सचा मोठा व्यापार आहे. अमूल, पेप्सिको, कोका-कोलाचे अधिकांश पेय पदार्थ प्लास्टिक स्ट्रॉ सोबतच पॅक करून ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात. असेही या पत्रात म्हण्यात आले आहे.