केंद्र सरकारकडून आणखी एका कंपनीचं खासगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारला सार्वजनिक युनिट एचएलएल लाईफकेअर (HLL Lifecare) च्या खासगीकरणासाठी सुरूवातीच्या टप्प्यात अनेक बिड्स मिळाल्या आहेत. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी सोमवारी ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली.
“एचएलएल लाइफकेअरच्या खाजगीकरणासाठी अनेक स्वारस्य पत्र (EoIs) प्राप्त झाले आहेत. हा व्यवहार आता पुढील टप्प्याकडे वाटचाल करत आहे,” असं पांडे म्हणाले. आता या प्रकरणी पडताळणीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर इच्छुक बोलीदारांकडून आर्थिक निविदा मागवल्या जातील. प्रारंभिक निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १४ मार्च होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Multiple expressions of interest received for privatization of HLL Lifecare Limited (HLL). The transaction moves ahead to the next stage. pic.twitter.com/hIGG41Vak7
— Secretary, DIPAM (@SecyDIPAM) March 14, 2022
१०० टक्के हिस्स्याची विक्री
DIPAM ने १४ डिसेंबर रोजी आरोग्य क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमामधील सरकारच्या १०० टक्के हिस्स्याच्या विक्रीसाठी प्रारंभिक निविदा मागवल्या होत्या. EOI सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी होती, जी नंतर २८ फेब्रुवारी आणि नंतर १४ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली. एचएलएल लाइफकेअर हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.