Join us

पीपीई किटच्या निर्यातीला सरकारची परवानगी; मासिक ५० हजार किटचा कोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 3:13 AM

देशामध्ये मास्कचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असून, त्यांच्या निर्यातीला सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी मास्क उत्पादकांच्या संघटनेने केली आहे

नवी दिल्ली : कोविड-१९च्या इलाजामध्ये वापरली जाणारी व्यक्तिगत सुरक्षा साधने (पीपीई)च्या निर्यातीसाठी सरकारने आता परवानगी दिली असून, त्यासाठी मासिक ५० हजार किट्सचा कोटा निश्चित केला आहे.

आतापर्यंत कोविड-१९च्या उपचारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या पीपीई किटची निर्यात करण्यासाठी सरकारने बंदी केली होती. आता ही बंदी काही प्रमाणामध्ये उठविण्यात आली आहे. देशामधून दरमहा ५० हजार किट्सची निर्यात करण्यासाठी सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे. कोविड-१९च्या रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय पथकाकडून पीपीई किटचा वापर केला जातो. या किटमुळे हे कर्मचारी कोविड-१९च्या प्रसारापासून दूर राहू शकतात.

परकीय व्यापार महासंचालनालयाने एक अधिसूचना जारी केली असून, त्यामध्ये दरमहा ५० हजार पीपीई किट्सच्या निर्यातीला परवानगी दिली जात असल्याचे जाहीर केले आहे. पीपीई चिकित्सा साधने निर्यात करण्यासाठी ज्या आस्थापनांना परवानगी आहे, त्या आस्थापना यासाठी अर्ज करण्यास पात्र असल्याचे महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे. त्यासाठीची पात्रता एका वेगळ्या सूचनेद्वारे जाहीर केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पीपीई किट शिवायची अन्य सर्व सामग्री ही निर्यातबंदीच्याच यादीमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. कोविडच्या उपचारासाठी असलेली सामग्री निर्यात करण्यासाठी सरकारतर्फे प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.मास्क निर्यातीसाठी परवानगी मिळावीदेशामध्ये मास्कचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असून, त्यांच्या निर्यातीला सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी मास्क उत्पादकांच्या संघटनेने केली आहे. देशामधून एन-९५ या मास्कव्यतिरिक्त अन्य मास्कच्या निर्यातीला परवानगी दिलेली नाही. देशामध्ये कोविड-१९चा प्रसार होण्याला प्रारंभ झाल्यापासून मास्कच्या निर्मितीमध्ये मोठी वाढ झाली असून, त्यांचे उत्पादन गरजेपेक्षा अधिक झालेले असल्याने सरकारने मास्कच्या निर्यातीला परवानगी देण्याची मागणी उत्पादकांच्या संघटनेने एका निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्या